मुक्तपीठ टीम
कथाकथनातून अध्ययनाच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने कथा यात्रा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमात सहभागी झालेले मुंबईतील शालेय विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. इंडिया टुरिझमच्या प्रादेशिक कार्यालयाने मुंबईतील कुलाबा नेव्हीनगरमधील केंद्रीय विद्यालय क्रमांक दोन या माध्यमिक शाळेच्या १५० विद्यार्थ्यांसाठी कथाकथनाचे सत्र आयोजित केले होते. त्यावेळी हा अनुभव आला.
पर्यटन विभागाचा कथायात्रा उपक्रम
- या कथा यात्रेचे उद्दिष्ट भारत सरकारचा एक भारत श्रेष्ठ भारत (ईबीएसबी) हा उपक्रम आणखी पुढे नेण्याचा आहे.
- मुंबईतील धी(Dhi) प्रकल्पाच्या पथकाने दृक्श्राव्य माध्यम आणि नाट्यरूपांतराच्या सहाय्याने कथाकथन सत्राचे आयोजन केले.
- आजच्या कथायात्रा सत्रामध्ये महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यांमधील संबंध मांडण्यात आले.
- कथाकथनाची कौशल्ये अधोरेखित करून या दोन रांज्यांच्या वैभवाची माहिती देण्यात आली.
- शालेय विद्यार्थ्यांना त्यात गुंतवून ठेवण्यात सादरकर्ते यशस्वी झाले.
सत्रादरम्यान मनोरंजक गोष्टींमध्ये मग्न झालेल्या विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांतील इतिहास, संस्कृती, खाद्यपदार्थ, कला, नृत्याचे स्वरूप, स्मारक, पर्यटन आकर्षणे याबद्दल अमूल्य माहिती घेतली. या सत्रामुळे बालकांच्या कोवळ्या मनांना या दोन राज्यांबाबत शोध, परीक्षण आणि संस्कृतींशी जोडून घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. सत्राच्या अखेरीस, तिथल्या तिथेच एक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली आणि विजेत्यांना इनक्रेडिबल इंडिया मर्कंडाईज हे पुरस्कार म्हणून वितरित करण्यात आले.
कथा यात्रा उपक्रमाचा उद्देश भारतातील समान आणि वेगळी वैशिष्ट्ये असलेल्या राज्यांमधील कथा समोर आणून जागृती करणे तसेच देशाच्या युवकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करण्याचा आहे. कथा यात्रा ही भौगोलिक विविधतेनुसार देशातील कथा आणि कथाकथनाच्या विविध पद्धती समोर आणण्याची आगळी वेगळी अशी संकल्पना आहे. धी प्रकल्पाने इंडियाटुरिझम मुंबईसाठी केलेल्या कथायात्राचा उद्देश भारतातील ज्ञात आणि अज्ञात कथांद्वारे स्थानिक दंतकथा आणि आख्यायिका, स्वातंत्र्याच्या खुणा, प्रादेशिक कला आणि संस्कृती, परंपरा, पद्धती, स्थापत्य कला, क्रीडा आणि संगीत, खाद्यपदार्थ आदींचा शोध घेण्याचा आहे.