मुक्तपीठ टीम
नॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग अथॉरिटी म्हणजेच एनपीपीए ही एक औषधांच्या किंमतींसाठी निश्चित करण्यात आलेली नियामक संस्था आहे. आता या संस्थेने ८४ औषधांची किरकोळ किंमत निश्चित केली आहे. यामध्ये मधुमेह, डोकेदुखी, उच्च रक्तदाब यावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे प्रमुख आहेत. या निर्णयामुळे कोलेस्टरॉल आणि ट्रायग्लिसराईडची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त औषधांच्या किंमतीही कमी होतील.
एनपीपीए अधिसूचनेनुसार महत्वाच्या सूचना
- जर कोणत्याही औषध उत्पादक किंवा विपणन कंपनीने जास्त किंमत आकारली असेल तर त्यांच्याकडून व्याजासह अतिरिक्त खर्च वसूल केला जाईल.
- या बदलानंतर, जीएसटी वेगळा राहील, परंतु औषध उत्पादकांनी स्वतःच सरकारला किरकोळ किंमतीवर जीएसटी भरला असेल तरच ते वसूल करू शकतील.
- एनपीपीए अधिसूचनेनुसार, पॅरासिटामॉल-कॅफीन टॅब्लेटची किंमत २.८८ रुपये असेल, व्होग्लिबोज आणि मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराइड टॅब्लेटची किंमत १०.४७ रुपये असेल आणि रोसुवास्टॅनिन ऍस्पिरिन आणि क्लोपीडोग्रेल कॅप्सूलची किंमत १३.९१ रुपये असेल.
एनपीपीएचे काम देशातील औषधे आणि फॉर्म्युलेशनची उपलब्धता राखण्यासाठी किंमत, नियंत्रण आणि निर्देश प्रदान करणे हे आहे. औषध उत्पादकाने जास्त किंमत आकारल्यास त्याच्याकडून ती वसूल केली जाते. जी औषधे किंमत नियंत्रण यादीत नाहीत, ही संस्था त्यांच्यावर देखरेख ठेवते.