मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर शिवसेना बंडखोर आमदारांवर हल्ला चढवला. ते म्हणाले की निवडणुकीच्या आधीच ते नैतिकतेच्या परीक्षेत…मोरल टेस्टमध्ये नापास झाले. त्यांच्यातील एकाचीही आमच्या डोळ्यांना डोळे देण्याची हिंमत झाली नाही. इथे ही अवस्था तर मतदारसंघात ते शिवसैनिक, मतदारांना कसे सामोरे जाणार?
आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात आल्यानंतरही सकाळी सरकारवर हल्ला चढवला होता. आता या आमदारांना कोणी नेईल याची यांना भीती आहे का, एवढा बंदोबस्त, मध्ये दोरी बांधलेली, असं का?
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलतानाही आदित्य ठाकरेंनी टोलेबाजी केली. ते म्हणाले, जर अडीच वर्षांपूर्वीच भाजपाने असं मान्य केलं असतं (शिवसेनेचा अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री) तर असंच तेव्हा झालं असतं!
सभागृहाच्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरेंना माध्यमांशी बोलताना ते अधिकच तिखट बोलले. ते म्हणाले, “शिवसेनेचे बंडखोर आज मोरल टेस्ट म्हणजे नैतिक चाचणीत नापास झाले. कुणीही आमच्या डोळ्यांना डोळे देऊ शकला नाही. त्यांची हिंमतच नाही झाली. इथे ही अवस्था तर मतदारसंघात परतल्यावर ते त्यांना निवडून देणारे शिवसैनिक, मतदारांना कसं सामोरं जाणार? “