मुक्तपीठ टीम
उदयपूर हत्याकांडसारखे प्रकरण अमरावती जिल्ह्यातही समोर आले आहे. गेल्या २१ जून रोजी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हेची एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी गळा चिरून हत्या केली. कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या, त्यामुळे ही घटना उदयपूरप्रमाणे असल्याचा आरोप भाजपाचे आमदार डॉ अनिल बोंडे यांनी केला आहे. या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयएचं पथक अमरावतीत दाखल झालं आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणात ५ आरोपींना अटक केली आहे. घडलेल्या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.
उदयपूरसारखे अमरावती हत्याकांड असल्याचा बोंडेंचा आरोप!
- अमरावती येथील अमित मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांनी नुपुर शर्माच्या समर्थनार्थ काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या आणि म्हणून त्यांची हत्या झाली, असा अंदाज अनिल बोंडे यांनी केला आहे.
- राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या हत्येप्रमाणेच अमरावती शहरात ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे.
- या हत्येचा काटेकोर तपास करावा अशी मागणी भाजपाच्या वतीनं पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती.
- अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत भाजपाचं एक शिस्तमंडळ पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांना भेटलं आणि घटनेचा मुख्य आरोपीचा तपास करा, अशी मागणी केली होती.
- या प्रकरणी अटकेत असलेल्या ५ आरोपींनी अद्याप हत्येचा उद्देश सांगितला नाही, आम्हाला एकानं हत्या करण्यास सांगितलं, अशी माहिती त्यांनी दिली.
हत्येचा सूत्रधार शोधण्यासाठी भाजपाची एसआयटी तपासाचीही मागणी!
- या हत्येचा सूत्रधार शोधण्यासाठी एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपनं केली होती. अशातच, एटीएस याप्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे.
- एटीएसच्या सूत्रांनी सांगितलं की, ते या प्रकरणाचा दहशतवादाशी संबंध आहे का? याचा तपास करत आहे.
- उदयपूरच्या आरोपींप्रमाणे अमरावतीच्या आरोपींनीही हाच नमुना वापरला आहे का, याचा तपास एटीएस करत आहे.
- तपास अजूनही स्थानिक पोलिसांकडे आहे, पण एटीएस समांतर तपास करत आहे.
- एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, महाराष्ट्र एटीएसचं पथक गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत आहे.