मुक्तपीठ टीम
नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या टेलरची तालिबानी शैलीत गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेचे काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. या घटनेमुळे तेथे तणावाचे वातावरण आहे. जमावाने आंदोलने आणि जाळपोळही सुरू केली होती. एकीकडे दोन धर्मांध अतिरेकी प्रवृत्तीच्या तरुणांनी निर्घृण हत्येचे पाप केले असतानाच देशातील अनेक मुस्लिम संघटना आणि मौलवींनी त्याविरोधात भूमिका घेतली आहे. या कुकृत्याला दुःखद आणि जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. अजमेर दर्ग्याच्या दिवाणांकडून या क्रूर घटनेचा निषेध करत “भले प्राण जावो, देशात तालिबानी वृत्ती फोफावू देणार नाही!” असं स्पष्ट शब्दात बजावण्यात आलं आहे.
देशात तालिबानी वृत्ती फोफावू देणार नाही!
- अजमेर दर्ग्याच्या दिवाण साहिब यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
- कुराण शरीफ किंवा पैगंबर मोहम्मद अशा कृत्यांना परवानगी देत नाहीत.
- समाजातील सर्वांनी शांततेच्या मार्गाने एकता व अखंडता राखण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
- भले प्राण जावो, देशात तालिबानी वृत्ती फोफावू देणार नाही.
- काही लोकांच्या अशा कृत्याने इस्लाम आणि देशाची बदनामी होतेय.
- निरपराध लोकांचा रक्तपात घडवणे चुकीचे आहे.
दिवाण साहेब म्हणाले की, सरकारने दोषींवर आयपीसी आणि सीआरपीसीच्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी. मोबाईल आणि सोशल मीडियावर अशी विधाने करणाऱ्या लोकांना प्रसिद्धी देऊ नये, असे घडल्यास त्यांचा निषेध करण्यात यावा, असे ते म्हणाले.
उदयपूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह : जमियत
- जमियत उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस मौलाना हकीमुद्दीन कासमी यांनी पवित्र प्रेषितांच्या कथित अपमानाच्या संदर्भात उदयपूरमध्ये झालेल्या हत्येचा निषेध केला आहे.
- जमियत उलेमा-ए-हिंदच्या प्रेस सेक्रेटरींनी पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ही घटना ज्याने घडवून आणली त्याला कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही, हे देशाच्या कायद्याच्या आणि आपल्या धर्माच्या विरोधात आहे.
- आपल्या देशात कायदा व्यवस्था आहे, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.
- मौलाना हकीमुद्दीन कासमी यांनी देशातील सर्व नागरिकांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपली भूमिका बजावण्याचे आवाहन केले.