राज्यात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणने मुंबईत १० ई-वाहन चार्जिंग स्टेशन बनवलेयत. या आठवड्यात त्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. लवकरच चार्जिंग स्टेशन सर्वांसाठी खुले केले जातील. मुंबईनंतर पहिल्या टप्प्यात राज्यभरात पन्नास स्टेशन उभारले जात आहेत. पुढील वर्षापर्यंत महाराष्ट्रात एकूण ५०० स्टेशन तयार करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईत चार, ठाण्यात सहा, नवी मुंबईत चार आणि पनवेलमध्ये चार इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन असतील. या १८ पैकी १० जवळजवळ तयार आहेत. या ई-चार्जिंग पॉईंट्ससाठी महावितरणने एक नवीन मोबाइल अॅपही तयार केले आहे जे ग्राहक सहजपणे डाउनलोड करू शकतात. हा अॅप ई-स्टेशन नागरिकांसाठी खुले झाल्यावर सुरू करण्यात येणार आहे.
अॅप आणि जीपीएस-आधारित नकाशाचा वापर करून लोक जवळचे ई-चार्जिंग स्थानके शोधू शकतात. “ग्राहकांना चार्जिंग पॉईंटवर क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल आणि एक ओटीपी दिला जाईल. याचा उपयोग करून एखादी व्यक्ती ऑनलाइन पेमेंट करू शकते.
ई-वाहन चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी अंदाजे अडीच लाख रुपये खर्च येणार असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ही वेगवान चार्जिंग स्टेशन असतील. या सेटअपमध्ये वाहन पूर्णपणे चार्ज करण्यासाठी ४५ मिनिटे ते एक तासाची आवश्यकता आहे. तर रात्री दहा ते पहाटे सहाच्या दरम्यान वाहनांच्या शुल्क दरात सवलत देण्याची योजना असल्याचे सूत्रांनी सांगितले.