मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या राजकारणातील गुन्हेगारीकरण आता उघड होत आहे. आमदार कैलास पाटील यांनी त्यांना गुजरातला घेऊन जाणाऱ्या गाडीतून सुटका करून घेतली, त्याला २४ तास उलटत नाहीत तोच शिवसेनेचे अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी सुरतहून सुटका करून घेत धक्कादायक माहिती उघड केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना काहीही झालेलं नसताना सुरतमधील गुजरात पोलिसांनी रुग्णालयात नेलं. पोलिसांनी आमदार नितीन देशमखांना काहीही झालेलं नसताना त्यांना हार्ट अटॅक आल्याचे सांगितले. अनेकांनी त्यांना धरून ठेवलं आणि जबरदस्तीनं इंजेक्शन दिलं. त्यामागे संशयास्पद हेतू असल्याचा आरोप करत आमदार देशमुख यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर आजही ते उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक असल्याचे ठासून सांगितलं.
वाचा आमदार नितीन देशमुखांच्या शब्दात नेमकं काय घडलं…
रात्रीच्या ३ वाजचा मी हॉटेलच्या बाहेर उभा होतो. १००-२०० पोलीस माझ्या पाठी होते. मी गाडीची वाट बघत होतो. यानंतर १००-२०० पोलिसांनी मला रुग्णालयात दाखल केले आणि मला अटॅक आल्याचे नाटक रचले. मला कोणताही हार्ट अटॅक आलेला नाही. माझी तब्येत टकाटक आहे आणि तुमच्यासमोर चांगल्या परिस्थितीमध्ये, चांगल्या तब्येतीत मी उभा आहे.
काल त्याठिकाणी मला तिथल्या पोलिसांनी जबरदस्तीमध्ये रुग्णालयात नेलं किंवा मला अटॅक आला म्हणून तुमच्यावर कारवाई करायची आहे. मला कोणत्याही प्रकारचा अटॅक आला नव्हता, कोणत्याही प्रकारची माझी बीपीसुद्धा वाढलेली नव्हती. पण अटॅक आला म्हणून त्यामागचा हेतू त्यांचा काय होता? त्यांचा हेतूच काहीतरी चुकीचा होता. रुग्णालयात घेऊन गेल्यावर २०-२५ लोकांनी पकडून जबरदस्तीने माझ्या दंडात इंक्जेक्शन टोचण्यात आलं. ते इंजेक्शन कोणते होते? काय होते? मला माहिती नव्हतं. परंतु माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचं षडयंत्र त्या लोकांचं होतं. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि शिवसेनेसोबत राहणार आहे.