मुक्तपीठ टीम
पालघरमधील एका व्यायामशाळेच्या चालकावर अॅसिड हल्ला झाल्याची घटना बुधवारी रात्री विरार मध्ये घडली. २७ वर्षीय रितेश कदम असे या हल्ल्यात जखमी झालेल्या चालकाचे नाव असून त्याच्यावर मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. व्यक्तिगत वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी शुक्रवारी वर्तवली आहे.
विरार पूर्वेला असणाऱ्या आरजे बारजवळ रितेश कदम यांच्या मालकीची स्वीट बॉक्स फिटनेस जिम आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास रितेश घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक रितेशवर अॅसिड फेकले. आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. जखमी अवस्थेत रितेश यांना उपचारासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जिममालक आणि आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय हरिश्चंद्र याला होता. याचा राग मनात ठेवून हरिश्चंद्रने त्याच्या एक साथीदाराच्या मदतीने अॅसिड हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.