मुक्तपीठ टीम
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. एकूण १० जागांसाठी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होत आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी ५ वाजता सुरु होणार आहे. या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघडी सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काहीही झालं तरी आमचेच पाच उमेदवार निवडून येणार असा दावा भाजपाकडून केला जातोय. तर दुसरीकडे आमचा विजय होणार असं महाविकास आघाडीकडून म्हटलं जात आहे. दोन्हीकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे.
बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा- अनिल बोंडे
भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सूचक ट्वीट केले आहे. “काळ आला होता भाऊ किंवा भाईवर, पण मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा.” त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याचे थेट नाव न घेता या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याबद्दल सांगितलं आहे.
काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा…#MLCElection2022 #MahaVikasAghadi
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) June 20, 2022
धोका एकतर्फी असतो का? – संजय राऊत
- विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व आमदार एकत्र आहेत. ही एकजूट सध्याकाळी आठच्या दरम्यान कळून येईल.
- महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष हातात हात घालून चाललेले आहेत.
- धोका वगैरे शब्द यावेळी वापरणे योग्य नाही.
- आम्हाला धोका असेल तर समोरच्यांना नाही का?
- धोका एकतर्फी असतो का?
- नाना पटोलेंनी जे सांगितले त्यामध्ये तथ्य आहे.
- आमदार पक्षासोबत असतानाही त्यांना सातत्याने धमक्यांचे निरोप येत होते.
- पण त्याचा काही परिणाम होणार नाही कारण लोकशाही आहे.
- लोकशाहीला काही मालक निर्माण झाले असले तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही या सर्वावर मात करु.
- आजची निवडणूक ही महत्त्वाची आहे.
- महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील.
रोहित पवारांनी करुन दिली ‘मी पुन्हा येईन’च्या अतिआत्मविश्वासाची आठवण!
- भाजपा अतिआत्मविश्वास दाखवत असून राज्यसभेला केलेली चूक आम्ही यंदा करणार नाही.
- राज्यसभेने आम्हाला खूप काही शिकवलेलं आहे.
- विरोधी पक्ष कुठल्याही स्थराला जाऊ शकतो.
- कुठल्या आमदारावर दबाव आणू शकतो.
- या साऱ्या गोष्टी आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी पाहिल्या आहेत.
- निवडणूक आयोगापर्यंत प्रकरण गेलं होतं.
- पण आम्ही राज्यसभेचा निकाल स्वीकारला.
- मात्र या निवडणुकीला राज्यसभेच्या वेळेस ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टींबद्दलची काळजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेली आहे.
- आमदारांबद्दल विचाराल तर आम्ही महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बाजूने आहोत.
- गेल्या वेळेस एक मत बाद झालं तर सगळं समीकरण बदललं. या वेळेस प्रत्येक मताची काळजी आम्ही सर्वांनी घेतलीय.
- आम्हाला विश्वास आहे. तर आमच्या विरोधात असणाऱ्या पक्षाला अतिआत्मविश्वास आहे.
- एवढेच सांगू शकतो की सहाच्या सहा उमेदवार निवडून येतील.