मुक्तपीठ टीम
देशातील सर्वात मोठे उद्योगपती गौतम अदानी आता भारतात कार्बन फ्री इंधन तयार करणार आहेत. यासाठी त्यांनी फ्रान्समधील आघाडीच्या ऊर्जा कंपनी टोटल एनर्जीसोबत करार केला आहे. फ्रेंच ऊर्जा कंपनी जगातील सर्वात मोठी ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम तयार करण्यासाठी गौतम अदानी यांच्या ग्रीन हायड्रोजन उपक्रमातील २५ टक्के हिस्सा खरेदी करतील. फ्रान्सची टोटल एनर्जी पुढील १० वर्षांत गौतम अदानी यांच्या ग्रीन हायड्रोजन उपक्रमात ५० अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक करेल. असे मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.
टोटल एनर्जी २५% हिस्सा खरेदी करणार
१. अदानी समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टमची संयुक्तपणे उभारणी करण्यासाठी फ्रेंच कंपनीसोबत नवीन भागीदारी केली आहे.
२. मात्र, या कराराच्या रकमेची माहिती निवेदनात देण्यात आलेली नाही.
३. या धोरणात्मक करारामध्ये, टोटल एनर्जी गौतम अदानी यांच्या अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडमधील अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडमधील २५ टक्के भागीदारी विकत घेईल.
४. फ्रेंच कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की टोटल एनर्जीने अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडमधील २५ टक्के हिस्सेदारी घेण्यासाठी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडसोबत करार केला आहे.
ऊर्जा उत्पादन आणि विक्री वाढेल
१. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, अदानी-टोटल एनर्जी संबंधांचे धोरणात्मक महत्त्व व्यवसायाच्या पातळीवर आणि महत्त्वाकांक्षेच्या पातळीवर खूप मोठे आहे.
२. टोटल एनर्जीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक पेने म्हणाले की, भविष्यातील १० लाख टन ग्रीन हायड्रोजनची प्रतिवर्षी उत्पादन क्षमता कंपनीला नवीन डीकार्बोनाइज्ड रेणूंचा हिस्सा एकूण ऊर्जा उत्पादन आणि विक्रीच्या २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मदत करेल.
दरवर्षी १० लाख मेट्रिक टन उत्पादन होईल
अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड हे भारतातील ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन आणि व्यावसायीकरणासाठी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि टोटल एनर्जीमधील एकमेव व्यासपीठ असेल. टोटल एनर्जीने सांगितले की, अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडने २०३० पर्यंत दरवर्षी १० लाख मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अदानी समुहाने सांगितले की ग्रीन हायड्रोजनवर लक्ष केंद्रित केलेल्या या भागीदारीमुळे भारतातील आणि जागतिक स्तरावर ऊर्जा बदलण्याची अपेक्षा आहे.