मुक्तपीठ टीम
अग्निपथ योजनेविरोधात देशात उसळलेल्या तरुणाईच्या संतापाचा वणवा अधिकच भडकत चालला आहे. बिहार, हरियाणा, राजस्थाननंतर तेलंगणामध्ये पेटलेलं आंदोलन आता उत्तरप्रदेशात जास्त भडकलं आहे.
सेनादलांमधील भरतीत केंद्र सरकारने केलेले बदल अन्याय्यकारक असल्याच्या भावनेतून तरुणाईचा संताप उफाळून आला आहे. अनेक राज्यांमध्ये हिसंक निदर्शने होत आहेत. बस-गाड्या फोडल्या जात आहेत. रस्ते जाम केले जात आहेत.
उत्तरप्रदेश
उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने सुरू आहेत. जौनपूर-प्रयागराज महामार्गावरील लाला बाजार येथील शिवगुलाम गंज तिराहे येथे आंदोलकांनी अनेक दुचाकी, दोन बस, पोलिसांच्या गाडीसह अनेक वाहनांचे नुकसान केले आहे.
यासोबतच सकाळी ९.३० वाजता एक बस आणि जीप जाळण्यात आली. पोलीस आल्यावर दगडफेक करण्यात आली. अनियंत्रित परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी आधी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि नंतर हवेत गोळीबार केला. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिस्थिती पूर्णपणे तणावपूर्ण आहे.
पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. जौनपूर-प्रयागराज महामार्ग बराच काळ जाम आहे. तर दुसरीकडे बदलापूरमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये एक किलोमीटरपर्यंत दगडफेक झाली. अनेक पोलिस ठाण्यांचे फौजफाटा बोलावण्यात आला.
बिहार
अग्निपथ योजनेच्या विरोध सर्वाधिक बिहारमध्ये दिसून येत आहे. तरुण आंदोलक रेल्वे स्थानकांची तोडफोड करत आहेत आणि गाड्या पेटवत आहेत. अशा परिस्थितीत रेल्वेने एक मोठी घोषणा केली आहे. बिहारमधील सर्व गाड्या शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.
पंजाब
पंजाबमधील लुधियाना रेल्वे स्थानकाची आंदोलकांनी तोडफोड केली. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई केली. सुमारे ८-१० जणांना पकडण्यात आले आहे. तिथेच. पंजाबमधील अमृतसर रेल्वे स्थानकावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.