मुक्तपीठ टीम
मुंबईतील महत्वाच्या पर्यटनस्थळांचं सौंदर्यीकरण आणि तिथं सुविधा पुरवण्यात येणार आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत त्याविषयी चर्चा करण्यात आली. खासदार अरविंद सावंत, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
पर्यटकांच्या सोयीसाठी गेट वे ऑफ इंडिया परिसर आकर्षक करणार
मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या परिसराचा पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने विकास करून तो अधिक आकर्षक करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
पर्यटन मंत्री आदित्य मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गेट वे ऑफ इंडियाच्या मुख्य भागाची आणि घुमटाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर परिसरातील विविध सोयी सुविधांची दुरूस्ती अथवा पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. यासाठी परिसरातील सुविधांची सुयोग्य रचना करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा परिसर आकर्षक करून येथे ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ७५ फुट उंचीचा ध्वज उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. सुरक्षारक्षकांची कॅबिन, स्वच्छतागृह, जुने वैभव दर्शविणारे पथदिवे, परिसराची माहिती देणारे फलक, रस्त्याच्या दुभाजकांवर लहान ध्वज लावण्यासाठी खांबांची रचना आदी सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानाचा इतिहास पुनर्जीवित करणार
मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलनाची सुरूवात याच मैदानातून केली होती. या मैदानाचा इतिहास पुनर्जीवित करण्यासाठी या मैदानाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, येत्या ऑगस्ट क्रांती दिनापूर्वी या मैदानाची तसेच परिसराची दुरूस्ती, पुनर्बांधणी तसेच सौंदर्यीकरणाची कामे पूर्ण करण्यात यावीत. परिसरातील रस्ते, पदपथांची दुरूस्ती करून स्वतंत्रता मार्गाची रचना करण्यात यावी. पेव्हर ब्लॉकचा वापर न करता मैदानाची नैसर्गिकता कायम ठेवावी. त्याचप्रमाणे ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व दर्शविण्यासाठी सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन विभागाने तज्ज्ञांचे पॅनल तयार करावे, असेही त्यांनी सांगितले. या परिसरात ऑगस्ट क्रांतीबाबत तसेच त्यामध्ये महाराष्ट्राच्या योगदानाबाबत माहिती दर्शविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
माहिम किल्ल्याला गतवैभव प्राप्त होणार
मुंबईतील माहिम किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. किल्ला परिसरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन नुतनीकरणानंतर या किल्ल्याला गतवैभव प्राप्त होणार असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यामुळे पर्यटकांची संख्या वाढून पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माहिम किल्ला परिसरात अनेक वर्षांपासून रहात असलेल्या नागरिकांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यानंतर जून अखेरपर्यंत हा परिसर रिकामा करून पुरातत्व विभागाच्या सल्ल्याने या परिसराचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करून किल्ल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश श्री. ठाकरे यांनी दिले. किल्ला आणि परिसराची पुनर्बांधणी आणि नुतनीकरणाचे काम करताना किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घ्यावे, तसेच किल्ल्याबाबत माहिती देण्यासाठी नाविण्यपूर्ण कल्पना राबवाव्यात, असेही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.