मुक्तपीठ टीम
कोरोना काळानंतर मनसेचे नेते वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्यात माणुसकीचं दर्शन घडलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पीएमपीएमएलच्या बसमध्ये अडकून पडलेल्या आईला आणि मुलाला त्यांनी घरी पोहोचवण्यास मदत केली असून ‘थोडे तरी शहाणे व्हा’ असा सल्ला नागरिकांना दिलाय. तसेच चालक आणि वाहकाने ज्याप्रकारे या महिलेची मदत केली याचे कौतुक वसंत मोरे यांनी केले आहे. त्यामुळे वसंत मोरेंची सर्वत्र चर्चा होत आहे. एकप्रकारे एसटी चालक – वाहक ‘नागनाथ नवरे’ आणि ‘अरुण दसवडकर’ यांनी कर्तव्याच्या पलीकडे जात जी माणुसकी एका भगिनीच्या सुरक्षेसाठी दाखवली त्या माणुसकीवर मनसे नेते वसंत मोरे यांनी तिला घरी सुखरुप पोहचवत कळस चढवला आहे.
वसंत मोरे यांनी या संपूर्ण घटनेची माहिती फेसबुकद्वारे शेअर केली आहे. त्यांनी संबंधित घटनेचे फोटोही शेअर केले आहेत. सध्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील अनेक पेसेजने ही पोस्ट शेअर केली आहे. मोरेंच्या या पोस्टला २० तासांमध्ये २४ हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं असून २ हजार ९०० हून अधिक जणांनी त्यावर कमेंट्स केल्यात.
वसंत मोरे यांची पोस्ट…
“वेळ रात्री पावणे बाराची, ठिकाण :- कात्रज कोंढवा राजस चौक. मी काल नेहमी प्रमाणे चौकातील भटक्या कुत्र्यांना खायला घालायला गेलो तर एक पीएमपीएमएलची बस पूर्ण लाईट लावून उभी होती आणि गाडीचा कंडक्टर गाडीभोवती फिरत होता ड्रायव्हर त्याच्या ड्रायवर सीटवर बसून होता.
थोडा संशय आला म्हणून कंडक्टरला विचारले काय प्रकार आहे? चालक आणि वाहकाकडे चौकशी केल्यानंतर, ते बोले की आम्ही सासवडवरून आलोत गाडीत एक महिला आहे. तिच्याकडे छोटे बाळ आहे. त्या इकडेच बाजूला राहतात. निघताना सांगितले होते की, त्यांना राजस चौकात त्यांचा दिर घ्यायला येईल, पण १५ मिनिटं झाली कोणचं येत नाही आणि फोन लागत नाही.
आम्हाला धड गाडी सोडता येईना आणि त्यांना पण आता रिक्षा ही मिळत नाही, अशी आपली अडचण त्यांनी दिली. त्यांचा दिर नाही आला म्हणून काय झाला मीच त्यांचा दिर झालो. त्या ताईला गाडीत घेतले आणि सुखरूप घरी पोचवले. घराच्या दारात पोचवले म्हणून फोटो ही काढला.
पण खरे धन्यवाद त्या एमएच १२ आर एन ६०५९ बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला. त्यांनी इतक्या रात्री त्या ताईला एकटी उतरू नाही दिली. त्या दोघांची नावे ‘नागनाथ नवरे’ आणि ‘अरुण दसवडकर.
एक चूक घरच्यांची, एकटी ताई इतक्या रात्री इतक्या पिशव्या घेऊन का सोडली? बरं सोडली तर मग नेण्यासाठी इतका निष्काळजीपणा का केला? थोडे तरी शहाणे व्हा, असा सल्लाही मोरेंनी शेवटी दिलाय.