मुक्तपीठ टीम
भारत गौरव योजनेंतर्गत पहिली खासगी ट्रेन सुरू झाली आहे. भारतीय रेल्वेने देशातील ही पहिली खासगी ट्रेन सुरू केली आहे. ही रेल्वे सेवा कोइबंतूर ते शिर्डी या मार्गावर धावणार आहे. या खासगी रेल्वेला १४ जून २०२२ रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासगी ट्रेन सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि ट्विट करून व्हिडिओही पोस्ट केला.
माहिती देताना, सीपीआरओ दक्षिण रेल्वे बी गुग्नेसन म्हणाले की, “भारत गौरव योजनेंतर्गत भारतातील पहिली खाजगी रेल्वे सेवा १४ जून रोजी कोइबंतूर येथून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रवाना झाली. उत्तरेकडील कोइबंतूर येथून सुटली आहे आणि गुरूवारी म्हणजेच १६ जून रोजी शिर्डीच्या साई नगर येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये एका वेळी १ हजार ५०० लोक प्रवास करू शकतात.” या रेल्वेची प्रवासात वेळोवेळी साफसफाई केली जाईल.
भारत गौरव रेल्वे कोइबंतूरहून सुटताना ७ स्थानकांवर थांबेल
- ही ट्रेन कोइबंतूरहून सुटेल ७ स्थानकांवर थांबेल.
- ट्रेन कोइबंतूर येथून सुरू होईल आणि तिरुपूर, इरोड, सेलम, येलाहंक, धर्मावरम, मंत्रालयम रोड आणि वाडी येथे थांबेल.
- तर शिर्डीहून परतताना ही रेल्वे वाडी, धर्मावरम, येलहंक, सेलम, इरोड आणि तिरुपूर येथे थांबेल.
- भारतातील पहिली खासगी ट्रेन कोइबंतूर सोडल्यानंतर सुमारे ५ तास मंत्रालयम रोड रेल्वे स्थानकावर थांबेल. जेणेकरून प्रवाशांना मंत्रालयम रोड मंदिरात चांगले दर्शन घेता येईल.
भारत गौरव रेल्वेमध्ये तिकीटांच्या किंमती
या ट्रेनमध्ये स्लीपर नॉन एसीसाठी २ हजार ५०० रुपये, थर्ड एसीसाठी ५ हजार रुपये, सेकंड एसीसाठी ७ हजार रुपये आणि फर्स्ट क्लास एसी तिकिटासाठी १० हजार रुपये मोजावे लागतील.
भारत गौरव रेल्वेची रचना
- भारतातील पहिल्या खासगी ट्रेनमध्ये एकूण २० डबे आहेत आणि ती २ वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.
- यामध्ये फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास आणि स्लीपर क्लासचे डबे आहेत.
- ही ट्रेन महिन्यातून किमान ३ वेळा धावणार आहे.
- ही ट्रेन कोइबंतूर उत्तरेकडून संध्याकाळी ६ वाजता सुटेल आणि गुरुवारी सकाळी ७.२५ वाजता शिर्डीच्या साई नगरला पोहोचेल.
- या ट्रेनमध्ये प्रवाशांना शाकाहारी जेवण दिले जाणार आहे. यासोबतच ट्रेनमध्ये एक डॉक्टरही प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी असणार आहे.