मुक्तपीठ टीम
पनवेल येथील घोटाळ्यात अडकलेल्या कर्नाळा बँक प्रकरणी सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांसह राज्याच्या उच्च पदस्थ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक पुढच्या आठवड्यात घेण्याचे ठरले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्या विधानभवनातील दालनात काल बैठक झाली. त्यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी हा निर्णय घोषित केला.
पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली काल विधानभवनात डॉ. निलमताई गोऱ्हे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. शिष्टमंडळात संध्याकाळच्या संपादिका रोहिणी खाडिलकर, पनवेल संघर्ष समितीचे खजिनदार संतोष कुमार शुक्ला, पनवेल शहर अध्यक्ष गणेश वाघिलकर, नावडे विभागीय अध्यक्ष योगेश पगडे यांचा समावेश होता.
मागील महिन्यात सहकार खाते, पोलिस, सीआयडी अधिकारी यांच्या समवेत डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी ऑन लाइन बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी केली का, पुढे काय झाले आणि ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी सहकार आयुक्तांनी कोणती पावलं उचलली याचा आढावा पुढच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.
मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनापूर्वी कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणाचा आढावा घेताना कांतीलाल कडू यांनी सुचविलेल्या नव्या मुद्द्यांना स्पर्श करणे ग्राहकांच्या हिताचे असल्याने ही बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पनवेलच्या राजकारणातील विविध पक्षांच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. त्यात संघर्ष समितीने ठेवीदारांसाठी आवाज उठवून हे प्रकरण अडगळीत पडण्यापूर्वी पुन्हा चर्चेत आणल्याने भल्याभल्यांना धडकी भरली आहे.