मुक्तपीठ टीम
भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी अनेक उत्तम सुविधा पुरवते. एखाद्या लांबच्या प्रवासाला रेल्वेने जाताना रिजर्व्हेशन करावे लागते तर काहीवेळा एैन वेळेला तिकीटं बुक करावी लागतात.पण, तुम्हाला माहित आहे का की तुमच्या तिकिटावर दुसऱ्या कोणाला तरी ट्रेनने प्रवास करता येतो. ते कसे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, जाणून घ्या. तुम्ही तुमचे ट्रेनचे तिकीट दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकता, त्यानंतर ती व्यक्ती तुमच्या तिकिटावर सहज प्रवास करू शकते. यासाठी काही नियमही आहेत.
अनेकवेळा असे घडते की प्रवाशांसमोर काही गंभीर समस्या येतात, त्यानंतर ते प्रवास करू शकत नाहीत. यानंतर ती व्यक्ती तिकीट रद्द झाल्याबद्दल खूप चिंतेत असते आणि तिकीट रद्द करण्याचे शुल्क कापल्यानंतर त्याचे पैसे परत केले जातात. अशा अनेक समस्या समोर आल्या आहेत, ज्याच्या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीने काही उपाय शोधले आहेत. आता अशा समस्या होणार नाही कारण, तिकीट रद्द न करता दुसऱ्याला ट्रान्सफर करता येईल, त्यानंतर ती व्यक्ती त्या तिकिटावर प्रवास करू शकते.
तिकीट ट्रान्सफर करण्याची पद्धत काय आहे?
- यासाठी प्रवाशांना रेल्वे सुटण्याच्या २४ तास आधी जवळच्या रेल्वे आरक्षण कार्यालयात लेखी विनंती करावी लागेल.
- आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जोडीदार अशा कुटुंबातील सदस्यांना ई-तिकीट ट्रान्सफर केले जाऊ शकते.
- ज्या प्रवाशाच्या नावाने तिकीट काढले आहे त्याला ई-रिझर्व्हेशन स्लिपची प्रिंटआउट, मूळ ओळखपत्राचा पुरावा आणि ज्या व्यक्तीला तिकीट ट्रान्सफर करायचे आहे त्याच्याशी संबंध असल्याचा पुरावा द्यावा लागेल.
- प्रवासी ड्युटीवर असलेले सरकारी कर्मचारी असल्यास त्यांना योग्य अधिकार असल्यास, ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधी लेखी विनंती सबमिट करावी लागते. अशा सर्व विनंत्या एकदाच मंजूर केल्या जातील.