मुक्तपीठ टीम
राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. मुंबईत ओमायक्रॉन या व्हेरिएंटचे चार रुग्ण आढळल्याने मुंबईकरांची चिता वाढली आहे. सोमवारी मुंबईत ओमायक्रॉनच्या BA.4 चे तीन आणि BA.5 चा एक व्हेरिएंट आढळून आला आहे. यापूर्वी २८ मे रोजी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने प्रथमच ओमायक्रॉनच्या BA4 प्रकाराची चार आणि BA5 प्रकारच्या तीन रुग्णांची नोंद झाली होती आणि ही सर्व प्रकरणे पुण्यातील होती.
यात दोन ११ वर्षांच्या मुली आणि दोन ४० ते ६० वर्ष वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात होते, आता ते बरे झाले असून रुग्णांचा तपशील घेतला जात आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये कोरोनाच्या संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, बहुतेक रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत आणि मृत्यूचे प्रमाण देखील कमी आहे.
मे महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण!
- आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाचे ९,३५४ रुग्ण आढळले होते, त्यापैकी ५,९८० मुंबईतील होते.
- गेल्या महिन्यात १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
- १ ते १२ जून दरम्यान राज्यात २३,९४१ बाधित आढळले असून त्यापैकी १४,९४५
- फक्त मुंबईतील असून या कालावधीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.