मुक्तपीठ टीम
एकीकडे राज्यात भाजपा शिवसेनेला आता क्र. १ची शत्रू मानत स्वबळावर लढून सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त करीत असताना दुसरीकडे नगर जिल्ह्यात मात्र वेगळंच घडत आहे. राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भाजपाकडून आता शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडली जात नसताना नगर जिल्ह्यात मात्र वेगळंच घडत आहे. नगरचे भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी मात्र शिवसेनेला कायम साथ देण्याचा निर्धार जाहीररीत्या व्यक्त केला आहे. तसं केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली तरी चालेल, असंही ते म्हणाले.
खासदार विखे पाटलांचा शिवसेनेला साथ देण्याचा निर्धार
- पारनेरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात विजय औटी आणि अन्य शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खासदार डॉ.
- सुजय विखे पाटील यांनी मनमोकळेपणानं आपलं मत मांडलं.
- मी खासदार म्हणून निवडून येण्यात ५० टक्के वाटा नगरमधील शिवसेनेचा आहे.
- त्यामुळेच मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललेलो नाही. मातोश्रीच्या विरोधात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
- यांच्याविरोधातही मी कधी बोललो नाही.
शिवसेनेला मदत करण्याचा निर्धार
- खासदार सुजय विखे पाटील तेथेच थांबले नाहीत.
- त्यांनी शिवसेनेला मदत करणार असल्याची जाहीर घोषणा केली.
- ते म्हणाले, माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेल्याचीही मला खंत नाही.
- केवळ पारनेरमध्येच नाही तर संपूर्ण नगरमध्ये भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील.
- जर शिवसेनेवर संकट आलं, तर मी या नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकटं सोडणार नाही.
- शिवसेनेला साथ दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली तरी चालेल.
विखे-पाटलांचा शिवसेनेला राष्ट्रवादीपासून सावध राहण्याचा इशारा
- खासदार सुजय विखे-पाटील यांनी शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसपासून सावध राहण्याचा इशाराही दिला.
- ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे.
- राज्यसभेच्या निकालावरून ती गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत वेळीच सावध व्हावे.
मुक्तपीठ विश्लेषण
- नगर जिल्ह्यातील विखे पाटील घराणं हे राजकारणातील मातब्बर घराणं आहे.
- राज्यात सहकारी साखर कारखाने चळवळीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या विठठ्लराव विखे-पाटलांच्या घराण्याचं खरं नातं काँग्रेसशी.
- पण काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात आणि नंतरही विखे-पाटील आणि शरद पवार यांच्यात कायम वैर राहिलं.
- पिढ्या बदलल्या पण पवार – विखेंमधील राजकीय वैरभाव काही संपलेला दिसला नाही.
- त्यातूनच शिवसेना-भाजपा युतीच्या १९९५नंतरच्या सत्ताकाळात स्व. बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण
- विखेपाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
- वडिल केंद्रात तर मुलगा राज्यात मंत्री झाले.
- पुढे राजकारण बदलताच ते स्वगृही परतले.
- त्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील नगरची लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने भाजपात गेले, खासदार झाले.
- आताही त्यांचे आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आमदार निलेश लंके, रोहित पवार यांच्यात चांगलं नाही.
- त्यामुळेच सुजय विखे पाटील यांच्या शिवसेनेविषयीचं प्रेम आणि राष्ट्रवादीच्या विरोधामागे हा भूतकाळही असल्याचं मानलं जातं.
- आगामी काळात नगरच्या राजकारणातही त्यांच्यासाठी ते फायद्याचं ठरु शकतं आणि शिवसेनेसाठीही!