मुक्तपीठ टीम
सांगली जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याला मजबूत कुंपण उभारणे, जल मृदसंधारण करणे, गवत कुरण विकास, वन वणवा नियंत्रण ही कामे प्राधान्याने करून या क्षेत्रातील वन समस्यांबाबत स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून तत्काळ कामे मार्गी लावावीत, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
मंत्रालयातील दालनात सांगली जिल्ह्यातील पलुस व कडेगाव वन विभागाच्या क्षेत्रातील समस्यासंदर्भात आयोजित बैठकीत राज्यमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी या बैठकीला आमदार अरुण लाड, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री.बेंझ, उपसचिव वने भानुदास पिंगळे, विभागीय वन अधिकारी विशाल माळी, किरण लाड, कुंडलिक ऐडके या बैठकीला उपस्थित होते.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील एकमेव असे मानव निर्मित अभयारण्य आहे. अभयारण्यातील वन विभागातंर्गत करता येतील अशी कामे स्थानिक ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेवून पूर्ण करण्यात यावीत. या अभयारण्याला मजबूत कंपाउंड नसल्यामुळे या अभयारण्यातील प्राणी शेतीचे नुकसान करतात त्याचबरोबर प्राणी देखील दगावण्याच्या घटना घडतात अशा तक्रारी आहेत. अभयारण्याच्या विकासाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जी कामे करता येणे शक्य आहेत त्याचा तात्काळ प्रस्ताव बनवावा आणि ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. या भागात अवैध वृक्षतोडी संदर्भातही वन विभागाने तत्काळ कारवाई करावी. सागरेश्वर अभयारण्य उत्कृष्ट पद्धतीने विकसीत करावे जेणेकरून या अभयारण्यामध्ये पर्यटन देखील वाढण्यास मदत होईल. या अभयारण्यासंदर्भात दहा दिवसाच्या आत केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करावी, अशा सूचना वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी बैठकीत दिल्या.
आमदार अरुण लाड यांनी सागरेश्वर अभयारण्य विकसित करण्याबाबत वन विभागाने तातडीने पाऊले उचलावीत. तसेच या भागातील अवैध वृक्षतोड थांबवून सागरेश्वर अभयारण्यामध्ये हरणांकरिता चारा उपलब्ध करावा. सागरेश्वर अभयारण्य विकसित करताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून वन विभागाने कामे करावीत, अशा सूचना बैठकीत केल्या.