मुक्तपीठ टीम
गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुजरातला आले. येथे त्यांनी ३ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारच्या ८ वर्षांच्या कामाची माहिती देत काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ज्या लोकांनी स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे सर्वाधिक राज्य केले, त्यांनी आदिवासी, दलित, मागासलेल्यांना मूलभूत सुविधा देण्याचे काम केले नाही, कारण त्यासाठी थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतात. असं असलं तरीही त्यांनी जाहीर केलेल्या ३ हजार कोटींच्या योजना या गुजरातला दिलेलं इलेक्शन गिफ्ट मानलं जात आहे.
३ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पांचा फायदा नवसारी, तापी, सुरत आणि गुजरातच्या दक्षिणेतील कोट्यवधी लोकांना होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेसचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी आदिवासी आणि मागास भागांच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आणि ते म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर ज्यांनी सर्वाधिक सरकार चालवले, त्यांनी विकासाला प्राधान्य दिले नाही. ज्यांना त्यांची सर्वात जास्त गरज होती त्यांच्यात त्यांचा विकास झाला नाही. कारण हे काम करण्यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते. आदिवासी गावे पक्क्या रस्त्यांपासून वंचित होती. गेल्या ८ वर्षात ज्यांना वीज, घर, शौचालये, गॅस कनेक्शन मिळाले त्यापैकी बहुतेक माझे आदिवासी, गरीब आणि मागासलेले बंधू-भगिनी होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “८ वर्षांपूर्वी तुम्ही मला तुमच्या आशीर्वादाने देशसेवेची भूमिका वाढवण्यासाठी दिल्लीला पाठवले होते. गेल्या ८ वर्षात आम्ही कोट्यवधी नवीन लोकांना, अनेक नवीन क्षेत्रांना विकासाची स्वप्ने आणि आकांक्षा यांच्याशी जोडण्यात यशस्वी झालो आहोत. आम्हाला गरीब, दलित, मागासलेले, वंचित, आदिवासी, या सर्वांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात आयुष्य घालवायचे.