मुक्तपीठ टीम
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी महापालिका ५०लाखाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. ५० लाखाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला महिला बालकल्याण समितीने मान्यता दिली. यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी महिला सुरक्षेला अधिक प्राधान्य देत सीसीटीव्हीचा प्रस्ताव दिला होता. याचबरोबर महापालिका शाळांसाठी दोन स्कुलबस , मनपा शाळेतील मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबीर आणि महिलांसाठी उद्योग केंद्र उभारणेच्या विषयांना महिला बालकल्याण समिती सभेत मंजुरी देण्यात आली. सभापती गीतांजली ढोपे पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.
महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीकडून अनेक योजना राबविण्यात येणार आहेत. याबाबत नुकतेच मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी समिती सदस्यांची बैठक झाली होती. या बैठकीतील चर्चेनुसार आज महापालिकेत महिला बालकल्याण समिती कार्यालयात सभापती गीतांजली ढोपे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.
सभेमध्ये मनपा क्षेत्रात महिला आणि बालकांच्या सुरक्षेतेसाठी ५० लाखाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, महापालिका शाळातील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबीर आयोजित करणे, मनपा शाळांसाठी दोन स्कुल बस घेणे आणि महिला बचत गट आणि महिलांसाठी उद्योग केंद्र उभारणे या विषयावर चर्चा होऊन सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली अशी माहिती सभापती गीतांजली ढोपे पाटील यांनी दिली. बैठकीस मबा सदस्यां नसीमा नाईक, शुभांगी साळुंखे, मदिना बारुदवाले, स्वाती पारधी, पवित्रा केरीपाळे, गायत्री कल्लोळी, सुनंदा राऊत, नगरसचिव चंद्रकांत आडके, प्रभाग १ चे सहायक आयुक्त नितीनकाका शिंदे, लिपिक स्मिता वाघमोडे आदी उपस्थित होते.