मुक्तपीठ टीम
दिल्ली मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटकेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नेमकं काय करणार, याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. भाजपा आणि काँग्रेसने केजरीवाल आणि आपच्या प्रामाणिकतेवरच संशय घेण्यास सुरुवात केली असताना, केजरीवाल हे त्यांच्याच पक्षाचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं अनुकरण करून जैन मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढतील की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसारखं तुरुंगात गेल्यानंतरही सहकारी मंत्र्यांला पदावरून काढणार नाहीत, असा प्रश्न विचारला जात आहे.
केजरीवालांचे निकटवर्तीय म्हणून सत्येंद्र जैन यांची ओळख!!
- नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली आहे.
- सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
- हवाला केस प्रकरणी सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीनं ही कारवाई केली आहे.
- ईडीनं सत्येंद्र जैन यांची यापूर्वी चौकशी केली होती.
- सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीनं ५ एप्रिल रोजी कारवाई करत त्यांची सपत्ती तात्पुरती जप्त केली.
- ईडीनं ४ कोटी ८१ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली होती.
- मेसर्स अकिंचन डेव्हलपर्स, मेसर्स इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेडवर मनी लाँड्रिंग कायदा २००२ नुसार कारवाई करण्यात आली.
आम आदमी पक्षाची सत्येंद्र जैन यांच्या अटकेवर भूमिका!
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी सांगितले की, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने आठ वर्षे जुन्या “बनावट” प्रकरणात अटक केली आहे. कारण ते हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे प्रभारी आहेत आणि भाजपाला तिथे आपमुळे पराभवाची भीती आहे.
हिमाचल गमावण्याच्या भीतीने अटक! – सिसोदिया
सिसोदिया यांनी ट्वीट करत सांगितले की, “सत्येंद्र जैन यांच्यावर आठ वर्षांपासून खोटा खटला चालवला जात आहे. आतापर्यंत ईडीने त्यांना अनेकवेळा बोलावले. दरम्यान, ईडीने अनेक वर्षे काहीही न मिळाल्याने बोलवण्याचे बंद केले. आता पुन्हा सुरुवात झाली कारण सत्येंद्र जैन हे हिमाचलचे निवडणूक प्रभारी आहेत. सिसोदिया यांनी दावा केला की, “भाजपा हिमाचल प्रदेशमध्ये वाईटरित्या पराभूत होत आहे. त्यामुळे हिमाचलला जाऊ नये म्हणून सत्येंद्र जैन यांना आज अटक करण्यात आली आहे. प्रकरण पूर्णपणे खोटे असल्याने ते काही दिवसांतच सुटतील.
आपच्या बदनामीसाठी कारवाई – संजय सिंह
राज्यसभा सदस्य संजय सिंग म्हणाले, “केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडून बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर, जैन यांना आता ईडीने ‘आप’ला बदनाम करण्यासाठी निराधार प्रकरणात अटक केली आहे.” दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि इतर मंत्र्यांवरील छाप्यांचा संदर्भ देत सिंह म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा आप आणि त्यांच्या नेत्यांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आम आदमी पार्टी हिमाचल प्रदेशची निवडणूक जोरदारपणे लढवेल. इतर आप मंत्री आणि आमदारांप्रमाणेच जैन यांना सर्व आरोपातून मुक्त केले जाईल, ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
ईडीने २०१८ च्या प्रकरणासंदर्भात जैन यांची चौकशी केली होती. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका या वर्षी होणार आहेत. पंजाबमधील विजयानंतर आम आदमी पक्ष हिमाचलमध्येही प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.
तपासात सहकार्य न केल्याने अटक – ईडी
- मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीत ईडीला सहकार्य न केल्यामुळे सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे.
या प्रकरणात जैन यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. - ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी तपासात त्यांना सहकार्य केले नाही आणि तपास यंत्रणेला त्यांना अटक करण्यास भाग पाडले.
केजरीवाल काय करणार…मान मार्ग की ठाकरे मार्ग?
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यावर भष्ट्राचाराविरोधात कारवाई केली. आरोग्य मंत्री विजय सिंगला यांनी एका अभियंत्याकडे लाच मागितल्याची तक्रार समोर येताच मान यांनी पुरावे तपासून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. तसेच मंत्री आणि ओएसडीविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश देत अटक करु दिले. त्यांच्या भूमिकेचे कौतुक स्वत: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरवींद केजरीवाल यांनी केलं होतं. याउलट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यांनी त्यांच्या पक्षाचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हाही नसताना केवळ आरोप होताच, त्यांना मंत्रिमंडळातून काढले. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिमशी कनेक्शनचे गंभीर आरोपांसह गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे. त्यामुळे आता केजरीवाल आपल्या पक्षाच्या मान यांच्या मार्गावर जातात की ठाकरेंच्या मार्गावर असा प्रश्न विचारला जात आहे.