मुक्तपीठ टीम
आपल्या सातारचा फुटबॉल खेळाडू अभिषेक सूर्यवंशी आता आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळणार आहे. अभिषेकचा मोहन बगान हा प्रसिद्ध संघ आता आशिया झोनच्या सेमीफायनलमध्ये धडकलाय. अभिषेक या अंतिम सामन्यांमध्येही जबरदस्त खेळी करेल अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील बुध गावच्या तरूण खेळाडू अभिषेक सूर्यवंशी गेले काही दिवस सातत्यानं चांगली कामगिरी बजावत आहे. मूळचा साताऱ्याचा असलेला अभिषेक सध्या पुण्यात राहतो. अभिषेकला फुटबॉलची प्रचंड आवड. आपल्या क्रीडाप्रतिभेच्या बळावर अभिषेकने फुटबॉल विश्वातील नामांकित मोहन बागान क्लबमध्ये स्थान मिळवले. मालदिवमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आशिया कप स्पर्धेत भाग घेण्याचीही त्याला संधी मिळाली.
आता आशिया फुटबॉल कप चषक स्पर्धेमध्ये एटीके मोहन बागानची आशिया झोनल सेमीफायनलसाठी निवड झाली आहे.
त्यामुळे सातारा जिल्ह्यातील बुधगावचा सुपुत्र असणाऱ्या अभिषेक धनंजय सुर्यवंशी हा आशियाई फुटबॉल कप चषक झोनल सेमी फायनलमध्ये खेळणार आहे.
अभिषेकची फुटबॉलची धडाकेबाज खेळी…
अभिषेक हा अत्यंत मेहनती आहे. फुटबॉलसाठी त्याने घेतलेल्या परिश्रमाचे आज त्याला आणि त्याला परिवाराला फळ मिळाले. प्रतिभा आणि परिश्रमाच्या बळावर अभिषेक आज या स्तरावर पोहोचला आहे. त्यामागे त्याच्या घरच्यांचं असलेलं भक्कम पाठबळही आहे. त्यांच्यामुळे तो हे सर्व करू शकला.
बाबांच्या लक्षात आले क्रीडाप्रेम
फुटबॉलप्रति असलेलं प्रेम, आवड धनंजय सूर्यवंशी म्हणजेच अभिषेकचे बाबा यांच्या लक्षात आले होते. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी फुटबॉलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जे.एन.पेटीट या पुण्यातील शाळेमध्ये त्याला दाखल केले. खेळासाठी अभिषेकला त्याचा मोठा भाऊ अतुल याच्याकडून प्रेरणा मिळालेली आहे.
मागे वळून पाहिले नाही…
नंदू अंगिरवार या कोचकडून अभिषेकला सुरुवातीला फुटबॉल खेळाचे प्राथमिक धडे मिळाले. वयाच्या दहाव्या वर्षीच बारा वर्षाखालील स्पर्धांमध्ये त्याला राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली. तिथून त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नेतृत्व केले. राष्ट्रीय संघांमध्ये त्याला वयाच्या १७ व्या वर्षीच ‘नॉमिनेशन’ प्राप्त झाले होते. ‘ए.टी.के कोलकाता’च्या ज्युनियर टीमचा कॅप्टन म्हणून त्यांनी यश मिळवले आहे.