मुक्तपीठ टीम
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना लंडनच्या संसद भवन येथील मानाचा ‘एशियन युके एक्सलन्स अवॉर्ड २०२२’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. लंडनचे खासदार वीरेंद्र शर्मा, नवेंडू मिश्रा व राडांक इंटरनॅशनल मिडिएटर एक्सपर्ट या संस्थेच्या संस्थापक डॉ. रेणू राज यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने समग्र व शाश्वत विकासाच्या क्षेत्रात युवकांना उत्तम शिक्षण जागतिक बाजारात योगदान देऊ शकतील अशी युवापिढी घडविण्याचे काम केले आहे. याच भरीव कामगिरीबद्दल डॉ. चोरडिया यांना नुकत्याच झालेल्या ‘एशियन युके बिझनेस समिट २०२२’मध्ये सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतासह लंडन, जपान, आयर्लंड, मॉरिशियस, ऑस्ट्रेलिया अन्य देशांचे मान्यवर उपस्थित होते. सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना या सन्मानाने गौरविण्यात आले.
या उत्तम कामगिरीबद्दल सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संपूर्ण टीमचे आयोजक व मान्यवरांनी अभिनंदन केले. व्यवसायाच्या संधी आणि भारत व लंडन यांच्यातील संबंध अजून दृढ करण्यासाठी हा सोहळा एक मोठी संधी असते. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात सहभागी होणे हे सूर्यदत्त परिवारासाठी सन्मानाची बाब होती. जगभरातून निमंत्रित करण्यात आलेल्या मोजक्या व्यक्तींमध्ये प्रा. डॉ. चोरडिया यांचा समावेश होता.
डॉ. चोरडिया यांच्या दूरदृष्टी, समर्पण, अथक प्रयत्नांमुळेच ‘सूर्यदत्त’ची वाढ झाली आहे. नाविन्यपूर्ण शिक्षणातील जागतिक दर्जाचे केंद्र बनले आहे. पाश्चिमात्य बाह्यदर्शनासह जागतिक दर्जाचे ज्ञानकेंद्र, नाविन्यपूर्ण, मूल्याधारित शिक्षण याची सांगड घातली गेली आहे. ‘सीएसआर’मधील त्यांचे योगदान व दर्जेदार शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सहयोग कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार वीरेंद्र शर्मा यांनी काढले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पुरस्कार स्वीकारत हा सन्मान आनंददायी असल्याची भावना व्यक्त केली. प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “एवढ्या दिग्गज मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत आहे. पुढील काळातही लंडनच्या विद्यापीठांबरोबर विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून काही काम करण्याची इच्छा आहे. हा पुरस्कार संस्थेचे सर्व भागीदार, कुटुंबीय, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांचा आहे. त्यांचे परिश्रम, समर्पण, प्रामाणिकपणा याचे कौतुक केले पाहिजे. सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी दर्जेदार शिक्षण देऊन जागतिक बाजारपेठेसाठी अब्जाधीशांना आकार देण्यासाठी जागतिक मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले.