मुक्तपीठ टीम
सध्या शाहरुख खान, अजय देवगण हे बॉलिवूड हिरो पान मसाल्यांच्या जाहिरातींमुळे सतत ट्रोल होत आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये एक धडा घेणारी घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात राहणाऱ्या धडकन जैन या तरुणीने ब्रदर्स डेच्या निमित्ताने चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि अजय देवगण यांना प्रत्येकी ५ रुपयांची मनीऑर्डर पाठवली असून पान मसाल्याचे पाकीट पाठवण्याचे आवाहन केले आहे. किंबहुना, दिग्गज चित्रपटसृष्टीतील व्यक्तींच्या पान मसाल्याच्या जाहिराती पाहून मोठ्या संख्येने तरुण पान मसाला खाण्याच्या व्यसनाने त्रस्त असल्याचे धडकनचे मत आहे. सेलिब्रिटींनी अशा जाहिराती केल्या नाहीत, तर तरुण पिढी पान मसालासारखे पदार्थ खरेदी करणार नाही.
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बीए प्रथम वर्षाची विद्यार्थींनी धडकन जैन ही शाहरुख खान आणि अजय देवगणची फॅन आहे. ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तिला भाऊ नाही, त्यामुळे ती शाहरुख आणि अजय देवगणला भाऊ मानते. हेच कारण आहे की, धडकनने ब्रदर्स डेच्या दिवशी तिच्या दोन्ही भाऊ शाहरुख खान आणि अजय देवगण यांना पान मसाल्याचे पॅकेट पाठवण्यास सांगितले आहे जेणेकरून दोन्ही अभिनेते लाजेपोटी याप्रकारच्या जाहिराती करणं बंद करतील.
धडकनने मनीऑर्डरसोबत लिहिले की, “मला तुमच्या हातून पान मसाल्याचे पॅकेट घ्यायचे आहे, कारण तुम्ही पान मसाल्याची विक्री वाढवण्यासाठी जाहिरात करत आहात. तूम्ही माझे आवडते अभिनेते आहात, मग का नाही मी पण पान मसालाही खायला सुरुवात करू.”
अनेक वेळा ट्विट केले
- धडकनने सोशल मीडियावर अनेक वेळा पोस्ट करून दोन्ही कलाकारांना पान मसाला जाहिराती न करण्याचे आवाहन केले आहे.
- धडकनने २८ मार्च २०२१ रोजी पहिले ट्विट केले होते.
- वाढदिवस आणि सणांच्या वेळी ट्विट करून अशा जाहिराती करू नका, असे आवाहनही ती कलाकारांना करते.
- तिने ट्विट करून दोन्ही कलाकारांच्या पत्नींना आवाहनही केले आहे.
धडकन सामाजिक कार्यही करते
- धडकन ही शिक्षणही घेतेच त्यासोबतच सामाजिक कार्यही करते.
- वर्षभरात ४ वेळा रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे.
- १८ व्या वाढदिवसानिमित्त प्रथमच रक्तदान केले, जे आजतागायत सुरू आहे.
- तिने देहदान करण्याचा संकल्पही घेतला आहे.