मुक्तपीठ टीम
काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम यांनी आपल्याच पक्षातील काही नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, काँग्रेसवर काही डाव्यांनी कब्जा केला आहे जे स्वतःला अधिक धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्यासाठी सातत्याने हिंदू धर्माचा अपमान करत आहेत. याचा काँग्रेस पक्षाला फटका बसत आहे. पक्षातील काही नेते भाजपाचे एजंट असून त्यांच्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काय म्हणाले प्रमोद कृष्णम?
- आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष काँग्रेस हा महात्मा गांधी, नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या विचारांचा पक्ष आहे.
- महात्मा गांधी हे स्वतः प्रभू रामाचे सर्वात मोठे उपासक होते आणि इंदिरा गांधी देवराहा बाबांच्या भक्त होत्या.
- सोनिया गांधी यांनी कुंभात स्नान केले आहे, तर राहुल गांधी यांनीही स्वतःला शिवभक्त असल्याचे वारंवार सिद्ध केले आहे.
- पण त्यांच्या पक्षातील काही लोक, ज्यांना ना काँग्रेस समजत आहे ना संविधानाच्या धर्मनिरपेक्ष भावनेचा खरा अर्थ समजत आहे, ते स्वतःला अधिक धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्यासाठी हिंदू धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत.
याचा काँग्रेस पक्षाला फटका बसत आहे.
धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे कोणत्याही धर्माला विरोध करणे नव्हे…
- ते म्हणाले की, देशाची राज्यघटना धर्मनिरपेक्ष करण्यात आली आहे, मात्र धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे कोणत्याही धर्माचा अपमान करणे नव्हे.
- असे असते तर प्रभू रामाच्या दरबाराचे चित्र संविधानाच्या पानावर कोरले गेले नसते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची जागा संस्कृतमध्ये लिहिली गेली नसती, जिथे धर्म आहे, तिथे विजय आहे.
- ते म्हणाले की, त्यांच्या पक्षासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हे समजून घेतले पाहिजे की धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे कोणत्याही धर्माला विरोध करणे नव्हे.