मुक्तपीठ टीम
रेल्वेने आपल्या सेवेचा दर्जा सुधारतानाच अधिकारी आणि कर्मचारी यांची संवेदनशीलताही वाढवत नेली आहे. त्यामुळे रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी आणखी जबाबदार आणि कार्यतत्पर बनू लागले आहेत. त्याचा फायदा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना होत आहे. गेल्या दोन दिवसांत रेल्वेने दोन प्रवाशांना मदत करून जीवनदान दिले. त्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेली घटना, मुंबईतून बिहारला परत चाललेल्या महिलेची आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका कर्करोगग्रस्त महिलेसोबतचा ऑक्सिजन सिलिंडर संपला. तक्रार येताच रेल्वेने तातडीने बाजारातून सिलिंडर मिळवला. तो त्या महिला प्रवाशापर्यंत पोहचवून तिचे प्राण वाचवले गेले.
जबलपूरहून पाटलीपुत्र स्थानकाकडे जाणाऱ्या मुंबई लोकमान्य टिळक-पाटलीपुत्र सुपरफास्ट ट्रेन १२१४१ च्या एसी टू टायरमधील आहे. त्या गाडीने प्रवास करणाऱ्या ४२ वर्षीय प्रवासी संचिता यांचा श्वास कोंडू लागला. मुंबईतून कर्करोगावर उपचार घेऊन त्या बिहारला परतत होत्या. नातेवाइकांनी पाहिले असता त्यांना दिलेला ऑक्सिजन संपला होता. ट्रेन कटनी स्टेशनजवळ होती. त्यांच्यासोबतच्यांनी रेल्वेच्या रेल्वे टीसीशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. बर्थ क्रमांक २६ वर महिलेची गंभीर स्थिती पाहून टीसीने तात्काळ जबलपूर नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
माहिती मिळाल्यावर, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक विश्व रंजन यांनी सतनाचे स्टेशन व्यवस्थापक कमर्शियल अवध गोपाल मिश्रा यांना नवीन ऑक्सिजन सिलिंडर आणि डॉक्टरांची ट्रेन सतना पोहोचेपर्यंत व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. स्थानिक रेल्वे अधिकारी बाजारातून ऑक्सिजन सिलिंडर घेऊन रेल्वे डॉक्टरांसह आले. रेल्वेचे डॉ. एस. सतीश यांनी महिलेची तपासणी करून तिला ऑक्सिजन पुरवठा सुरु केला.