तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
हैदराबादमध्ये सैराट झालं आहे. एका मुस्लिम तरुणीशी लग्न करुन सुखानं राहत असलेल्या हिंदू तरुणाची भर रस्त्यात भर गर्दीत निर्घृण हत्या झाली. मारेकरी पतीला ठेचून, भोसकून मारत असताना पत्नी आक्रोश करत होती. मदतीसाठी टाहो फोडत होती. गर्दीतील अनेकांचे तिने पायही धरले. पण सभोताली जमलेली जिवंत कलेवरं तिला मदत करणार कशी, तिच्या पतीआधीच त्यांचाही आत्मा मेला होता. ठार मेला होता. ते फक्त मोबाइलवर त्याचे हत्येची थरारक दृश्य टिपत राहिली. कारण त्यांच्याच सारखी कोट्यवधी गिधाडं सोशल मीडिया यूजरच्या रुपानं अशा व्हिडीओंच्या, फोटोंच्या शोधात घिरट्या घालत असतात. एखाद्याचा जीव वाचवण्यापेक्षा त्या गिधाडांची भूक भागवणे तिथं जमलेल्या हैदराबादी जिवंत कलेवरांना जास्त महत्वाचं वाटणं स्वाभाविकच होतं. अवलाद एकच. जिवंत शरीर आणि मेलेल्या मनाची!
नागराजू आणि अशरीनची प्रेम कहाणी…
हैदराबादमध्ये सैराट झालं ती प्रेम कहाणी नागराजू आणि अशरीनची आहे. नागराजू हा एका एका कार शोरूममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह होता. त्याचे शेजारच्या गावात राहणाऱ्या अशरीनवर खूप प्रेम होतं. अशरीनाचंही नागराजूवर तेवढंच. सात वर्षांच्या प्रेमानंतर दोघांनी आर्य समाजात लग्न केलं. अशरीन पल्लवी झाली. दोघेही सुखाने राहू लागले. नाव पल्लवी झालं तरी नागराजूने अशरीनच्या धार्मिक रितीरिवाजांमध्ये बदल केला नव्हता. ईद आली. त्याने तिला ईदचं शॉपिंग करून देण्यासाठी गळ्यातील सोन्याची साखळी २५ हजारात विकली.
मानवी गिधाडांच्या गर्दीत नागराजूचे लचके!
बुधवारी ईदसाठी तो घरी निघाला. त्याला घरी जाण्यास उशीर झाल्याने तो गणवेशातच घाईने निघाला. अशरीन तिच्या बहिणीकडे त्याची वाट पाहत होती. दोघे मोटर सायकलने निघाले. तेवढ्यात स्कूटरवरून आलेल्या हल्लेखोर सय्यद मोबीन अहमद आणि मोहम्मद मसूद अहमद यांनी या जोडप्याला रस्त्यात थांबवले. ते अशरीनचे भाऊ. त्यांनी मोटर सायकल थांबताच नागराजूलर लोखंडी सळईने हल्ला केला. त्याला रस्त्यावर पाडले. आपटले. त्याच्या डोक्याचे शिगेने तुकडेच केले. त्यानंतर चाकूनेही भोसकले. आपल्या नागराजूवर हल्ला होताना पाहून अशरीनाने टाहो फोडला. पण तिथं जमलेल्या गर्दीतील कुणीही मदतीला आले नाही. उलट अनेक मोबाइलवर रेकॉर्ड करत राहिले. मानवी गिधाडंच ती!
Heartbreaking to hear Syed Ashrin Sulthana, wife of 25-year-old Nagaraju who was bludgeoned to death on a busy road in #Hyderabad by her brother & his accomplice as he did not approve of her interfaith marriage; ‘why didn’t anyone help save my Raju, I begged all’ @ndtv @ndtvindia pic.twitter.com/pT2FksuT8b
— Uma Sudhir (@umasudhir) May 5, 2022
काही पुढे सरसावले…पण सर्व संपलेलं!
नागराजूला ठेचले, भोसकले त्यानंतर पुन्हा ते मारेकरी अशरीन थांबवत असतानाही त्याच्या मृतदेहाकडे जात होते. तेव्हा गर्दीतील काही पुढे सरसावले. पण तोपर्यंत सर्व संपलं होतं. तरीही नंतर आलेल्या त्या बहाद्दरांचं कौतुकच! समाजात सर्वच बघे नसतात, काही जिवंत माणसंही असता, हे त्यांनी दाखवलं.
अशरीनचा निर्धार…मी शेवटच्या श्वासापर्यंत सासरीच राहणार!
नागराजूच्या अमानुष हत्येचा धक्क्यातून अशरीना सावरलेली नाही. ती भावाला माफ करू शकत नाही. शक्यच नाही, असं बजावते. त्याचवेळी निर्धाराने सांगते, “शेवटच्या श्वासापर्यंत सासरच्या घरीच राहणार.
ओवेसी आता जागले!
एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असुद्दीन ओवेसी खूप बुद्धिमंत मानले जातात. हिंदू धर्मांधांवर ते तुटून पडतात, त्यामुळे अनेक सेक्युलर म्हणवणाऱ्यांना ते भावतात. काँग्रेससारख्या पक्षांचा घात होतो, तरी त्यांना चालतं. पण या ओवेसींचा बुरखा आता टरकावला गेला. ते हैदराबादचे खासदार. पण त्यांची जीभ उचलली गेली नव्हती. घटनेला ४८ तास उलटल्यानंतर ते जागले. अशी हत्या करणं अल्लाहला मान्य नाही, असं ते म्हणाले.
हैदराबादमध्ये याआधी एका दलित तरुणाचाही हत्या झाली होती!
नागराजूसारखंच एक प्रकरण काही वर्षांपूर्वी गाजलं होतं. ते होतं, एका दलित तरुणाच्या हत्येचं. नागराजूला अशरीनच्या घरच्यांनी मारलं तसंच त्यालाही त्याच्या पत्नीच्या घरच्यांनी मारलं होतं.
सैराट होतच राहतात…बघ्यांना अद्दल घडवाच!
येथे नागराजू हिंदू असणं मुस्लिमांसाठी गुन्हा ठरलं तिथं तो दलित असणं उच्चवर्णीय हिंदूंसाठी गुन्हा ठरलं होतं. नागराज मंजुळेंचा सैराट खूप गाजला होता. पण त्यातून कोण काय बोध घेतो की नाही काही कळत नाही. नावं बदलतात. जाती-धर्माची कारणं बदलतात. सैराट होतंच राहतं. मुळात त्यामुळेच मला या प्रकरणात अशरीनच्या भावांची खूनी मानसिकता जेवढी अमानुष वाटली, त्यापेक्षाही जास्त ती बघ्या व्हायरल एडिक्ट जिवंत कलेवरे खटकली. कायद्यात तरतुद करून अशा बघ्यांना शिक्षा झाली पाहिजे. सैराट करणाऱ्यांएवढेच ते पाहणारे, चालवून घेणारेही तेवढेच दोषी असतात!