मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाच वर्षांनंतर त्यांच्या गावी परतले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी आई सावित्री यांची भेट घेतली. आईला भेटल्यानंतर योगींनी तिच्यासोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. याआधी, पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या घरी पोहोचले होते. ११ फेब्रुवारी २०१७ रोजी यमकेश्वर येथे झालेल्या भाजप उमेदवाराच्या निवडणूक रॅलीदरम्यान योगींनी आपल्या घरी रात्र घालवली होती.
देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यामुळे आणि एवढी मोठी जबाबदारी मिळाल्याने योगी आदित्यनाथ गेल्या पाच वर्षांत आपल्या गावी येऊ शकले नाहीत. दरम्यान, २०२० मध्ये त्यांचे वडील आनंद सिंह बिश्त यांचेही निधन झाले. योगींना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबीय लखनौला जात असले तरी, आईला भेटण्याची त्यांची इच्छा कायम होती. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी गावात येणार असल्याचे सांगितले होते.
यूपीचे मुख्यमंत्री योगी हे त्यांच्या वैयक्तिक तीन दिवसीय दौऱ्यावर उत्तराखंडमध्ये आले आहेत. योगींनी आपल्या घरी रात्री विश्रांती घेतली. तीन दिवसांच्या दौऱ्यावर उत्तराखंडला पोहोचलेले योगी आदित्यनाथ विमानतळावरून थेट पौडी जिल्ह्यातील यमकेश्वर ब्लॉक अंतर्गत बिथयानीला रवाना झाले. पौडी जिल्ह्यातील यमकेश्वर ब्लॉक अंतर्गत बिथयानी येथे त्यांनी त्यांचे गुरू महंत अवेद्यनाथ यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. गुरूंचे स्मरण करून मुख्यमंत्री योगी भावूक झाले.
गुरु महंत अवेद्यनाथ यांच्या प्रतिमेचे अनावरण करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, “आज मला गुरुंच्या प्रतिमेचे अनावरण करण्याचा आणि माझ्या शाळेतील गुरूंचा सन्मान करण्याचा बहुमान मिळाला. मी ३५ वर्षांनी माझ्या गुरूंना भेटू शकलो आहे. मी आज जो काही आहे ते माझे आई-वडील आणि गुरु अवेद्यनाथ यांच्यामुळेच आहे.”