मुक्तपीठ टीम
आज ६२ वा महाराष्ट्र दिन आहे. मात्र हा ६२ महाराष्ट्र दिन राजकीयदृष्ट्या चांगलाच गाजणार आहे. आज राज्यात विविध राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकसत्ता या मराठी दैनिकाच्या मुलाखतीत सहभागी झाले. संध्याकाळी औरंगाबादेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुचर्चित जाहीर सभा होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सोमय्या मैदानावर ‘बूस्टर डोस’ रॅली होणार आहे. तर वंचित बहुजन आघाडी राज्यभर शांतता मार्च काढणार आहे.
मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. आज महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. औरंगाबादच्या सभेआधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न मनसेनं केला.
मनसेच्या राज ठाकरेंच्या सभेआधी देवेंद्र फडणवीसांची बुस्टर डोस रॅली होणार आहे. ही सभा मुंबईच्या सोमय्या मैदानावर होणार आहे. राज्यातील विविध घोटाळ्यांबाबत देवेंद्र फडणवीस बोलणार असल्याचे भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. त्यामुळे फडणवीसांच्या भाषणाचीही सर्वांनाच उत्सुकता आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी “राज्यातील वातावरण जातीयवादी करण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी” राज्यभर शांतता मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. यात मराठी साहित्य, नाट्य आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.