मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये बहुचर्चित जाहीर सभा होणार आहे. औरंगाबादमधील या जाहीर सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने आज रवाना झाले आहे. यापूर्वीच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे औरंगाबादमध्ये पोहचले असून त्यांनी राज ठाकरेंच्या सभास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या अटी-शर्टीवर भाष्य केलं. १ मे रोजी होणारी सभा भव्य-दिव्य असेल आणि आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत, असे ते म्हणाले.
१ मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबद मध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेसाठी मनसैनिकांनी जोरात तयारी केली आहे. याच दरम्यान राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे औरंगाबादमध्ये पोहचले आहेत. त्यांनी आज राज ठाकरेंच्या सभास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमित ठाकरे म्हणाले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या तयारीवर मी खूश आहे. राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घालून दिलेली आवाजाची मर्यादा पाळणं शक्य होईल का? असा प्रश्न विचारला असता अमित ठाकरे म्हणाले की, १ मे रोजी होणारी सभा भव्य-दिव्य असेल आणि आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत.
१ मे ला राज ठाकरे औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या सभेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते दाखल होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या या सभेकडे सर्व पक्षांचे लक्ष लागून आहे.