मुक्तपीठ टीम
बीड जिल्ह्यातील २२ वर्षीय टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्ये प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगले तापले आहे. या तरुणीच्या आत्महत्येच्या मागे शिवसेने नेते आणि वनमंत्री संजय राठोड असल्याचा थेट आरोप करत भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. एकीकडे राजकीय गदारोळ माजला असतानाच दुसरीकडे पूजाच्या वडिलांनी मात्र तिच्या मृत्यूमागे आर्थिक कारण असल्याचे सांगितले. त्यामुळे नेमकं काय घडलं असा एक वेगळा संभ्रम तयार होऊ लागला. त्याचवेळी शिवसेनेने संजय राठोडांचा राजीनामा घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अद्याप राजीनाम्याला कुणीही दुजोरा दिलेला नाही.
भारतीय जनता पार्टीकडून पूजा चव्हाण प्रकरण लावून धरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावर कडक भूमिका घेतली असली तरी त्यांनी संजय राठोड यांचं थेट नाव घेतलेलं नाही. त्याचवेळी चित्रा वाघ, अतुल भातखळकर यांनी मात्र थेट नाव घेत संजय राठोडांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्याचवेळी बंजारा समाजाच्या संघटनांनी मात्र संजय राठोडांना त्यांचे कार्य, वाढत्या प्रभावामुळे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांना जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. काहीही झाले तरी आमचा बंजारा समाज संजय राठोडांमागे एकजूटीनं उभं ठाकल्याची घोषणाही करण्यात आली.
एकीकडे राजकीय गदारोळ सुरु असताना पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणी तिच्या वडिलांनी एका टीव्ही चॅनेलला सांगितले की, पूजाच्या मृत्यूचे मूळ म्हणजे तिच्यासमोर उभी राहिलेली आर्थिक परिस्थिती आहे.
त्यांच्या बोलण्यातील महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत:
- लाखो रुपयांच्या कर्जामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पूजा मानसिक त्रासात होती.
- मला ब्लड प्रेशर आहे, त्यामुळे पूजा माझे सर्व काम बघत असे.
- मी पोल्ट्री फॉर्मच्या व्यवसायासाठी पूजाच्या नावावर कर्ज घेतले होते.
- हे कर्ज १७ ते १८ लाख रुपयांचे होते.
- लॉकडाऊनमुळे पोल्ट्री बंद झाली होती.
- मित्र आणि नातेवाईकांकडून काही पैसे उधार घेऊन परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचदरम्यान बर्ड फ्लू आला. नुकसान वाढले.
- पूजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण, कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बँकेकडून वारंवार मेसेजेस येत होते, त्यामुळे तिचा ताण वाढत गेला.
माझ्या मुलीची बदनामी थांबवा
व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत काय म्हणाले की, यात राजकारण असू शकते. माझ्या मुलीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. तसेच या प्रकरणात एखाद्या मंत्र्याचे नाव घेतले जात आहे का असे विचारले असता पूजाच्या वडिलांनी असे म्हटले आहे की, अशाप्रकारे कोणाचे नाव घेणे चुकीचे आहे. येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.
एकाकडे राजकीय वर्तुळात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात आहे. तर दुसरीकडे आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेणाऱ्या तरुणीच्या घरीची मंडळी आर्थिक ताणातून अशा पद्धतीचे पाऊल उचलले असल्याचे म्हणले आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढे काय निर्णय लागतो आणि शिवसेना काय निर्णय घेतात याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा: #पूजाचव्हाणप्रकरण आयुष्यातून कुणाला उठवू नयेच, पण न्यायही झालाच पाहिजे!
#पूजाचव्हाणप्रकरण आयुष्यातून कुणाला उठवू नयेच, पण न्यायही झालाच पाहिजे!