मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअॅपला चांगलेच ठणकावले आहे. तुमच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे भारतीयांच्या खाजगी आयुष्याच्या गोपनियतेबद्दल अनेक शंका व्यक्त होत आहेत. मुख्य न्यायाधीश बोबडे म्हणाले की, “तुम्ही अब्जावधी डॉलरची कंपनी आहात, पण लोकांचे खाजगी आयुष्य पैशांपेक्षा जास्त महत्वाचे आहे. बोबडे यांनी व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी दरम्यान व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे.
नवीन पॉलिसीबाबत लोकांच्या मनात शंका
न्यायालयाने जेष्ठ वकील श्याम दीवान यांच्या याचिकेचे समर्थन केले आहे. याचिकेनुसार, भारतात डेटा प्रोटेक्शनबाबत कोणताच कायदा नाही. मुख्य न्यायाधीश बोबडे, न्यायाधीश एएस बोपन्ना आणि न्यायाधीश वी रामासुब्रमण्यम म्हणाले की, दीवान यांच्या युक्तिवादाने आम्ही प्रभावित झालो. अशाप्रकारचा कायदा करायलाच हवा.
सर्वोच्च न्यायालयाने यूरोपच्या तुलनेत भारतात प्रायव्हसी स्टँडर्ड कमी केल्या आरोपांवरुन व्हॉट्सअॅपला उत्तर मागितले आहे. व्हॉट्सअॅपने यावर सांगितले की, युरोपमध्ये यासाठी विशेष कायदा आहे. जर भारतात असा कायदा आला, तर आम्ही त्याचे पालन करू.
काय आहे व्हॉट्सअॅपची नवीन पॉलिसी ?
व्हॉट्सअॅपच्या नवीन पॉलिसीनुसार, युजर जे कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोर, सेंड किंवा रिसीव्ह करणार, त्याचा कंपनी कुठेही वापर करू शकते. कंपनी त्या माहितीला कुठेही शेअर करू शकत आहे. ही पॉलिसी ८ फेब्रुवारी २०२१ पासून लागू होणार होती, पण प्रचंड विरोध झाल्यानंतर तारीख वाढवून १५ मे करण्यात आली.