मुक्तपीठ टीम
ओबीसी घटकाचे विविध प्रश्न मार्गी लावायचे असतील तर ओबीसी म्हणून सर्वांनी एकत्र रहावे लागेल आणि संघर्ष करावा लागेल असे मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. आज मुंबईत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कोकण विभागाच्या महत्वाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की ओबीसी समाजाला आरक्षण हे मोठ्या संघर्षातून मिळाले आहे. आदरणीय शरद पवार साहेब यांची मोठी साथ या संघर्षात होती. ओबीसींचे स्थगित झालेले राजकीय आरक्षणाचा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी समता परिषद आणि राज्य सरकार पुर्णपणे प्रयत्न करत आहे. शक्य असतील ते सर्व मार्गांचा आपण वापर करत आहोत. राजकीय आणि न्यायालयीन लढाई देखील चालू आहे. यापुढील काळात देखील संघर्ष करावा लागणार आहे यासाठी आपण तयार रहायला हवे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कोकण विभागातील संघटनात्मक बांधणीवर आता सर्वांनी भर देणे गरजेचे आहे. जनतेचे प्रश्न मांडायचे असतील तर संघटनात्मक बांधणी मजबूत असायला हवी.
मुंबईत पार पडलेल्या या बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह, कार्याध्यक्ष बापू भुजबळ, राज्य उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, मुंबई अध्यक्ष सदानंद मंडलिक, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजा राजपुरकर,राज्य सचिव रवि सोनवणे, सुभाष देवरे ,उमेश बोरगावकर, किरण झोडगे, ऍड भूमिका पाटील, ऍड स्वाती कांबळे,कुसुम गेडाम,संतोषी मोरे, राजेश मनोरे, विक्रम परमार हेमंत पाटील आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोकणासारख्या पुण्यभूमीने पुरोगामी महाराष्ट्राला अनेक महापुरुष दिले आहे त्यांचे विचार समाजातील तळागाळात पोहचविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करा. शाहू महाराज यांची स्मृती शताब्दी ही 6 मे रोजी आहे त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेऊन त्यांचे कार्य जनमानासापर्यंत पोहचवा. समता परिषद ही समाजासाठी कार्य करणाऱ्या सर्वांची आहे त्यामुळे समाजातील विविध घटकांचे प्रश्न मांडण्याचे काम आपण केले पाहिजे असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.