मुक्तपीठ टीम
एल्गार परिषद खटल्यातून उच्च न्यायालयाच्या तिसऱ्या न्यायाधीशांनी स्वत:ला वेगळं केलं आहे. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये दिवंगत स्टॅन स्वामीसह १६जण आहेत.
याआधी एसएस शिंदे आणि न्यायाधीश पीबी वराळे यांनी या प्रकरणातील सुनावणीस नकार दिला होता. त्यामुळे असं का घडतंय, अशी चर्चा सुरु झाली आहे.
न्यायमूर्ती साधना जाधव यांनी सांगितले की, त्यांनी या खटल्यांच्या सुनावणीपासून स्वतःला वेगळं केलं आहे. एल्गार परिषद किंवा कोरेगाव भीमा प्रकरण त्यांच्यासमोर ठेवू नये. त्यांनी आपल्या निर्णयाचे कोणतेही कारण सांगितले नाही.
न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव रोना विल्सन आणि शोमा सेन यांच्याविरुद्धचा खटला रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या दोन याचिकांची सुनावणी करत होते. वकील सुरेंद्र गडलिंग यांनी जामीन याचिका दाखल केली होती आणि पुजारी फ्रेझर मस्करेन्हास यांनी दाखल केलेल्या याचिकेत मागणी केली होती की, त्यांना स्वामी यांच्या वतीने दाखल केलेल्या खटल्याचा पाठपुरावा करण्यास परवानगी द्यावी. वैद्यकीय जामिनाच्या प्रतीक्षेत असताना कोठडीत स्टेन स्वामी यांचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
- हे प्रकरण ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणाशी संबंधित आहे.
- या भाषणामुळे कोरेगाव भीमा हिंसाचार घडल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
- या परिषदेला माओवाद्यांचा पाठिंबा असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.