मुक्तपीठ टीम
एकदा सचिन वाझे तर नंतर परमबीर सिंह…पोलीस अधिकाऱ्यांमुळे एक नाही तर दोन वेळा आघाडी सरकार संकटात सापडले. तरीही आघाडी सरकारने बुधवारी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या-बढत्यांचे आदेश जारी केले. बारा तास उलटत नाहीत तोच त्यातील पाच अधिकाऱ्यांच्या बढत्या-बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. गृहमंत्रालयाच्या या आदेश बदलांमागील गूढ आता वादाचा विषय ठरत आहे. भाजपाने आघाडी सरकारचा भ्रष्टाचार उघड झाल्याचा आरोप केला आहे.
मुंबई-ठाणे-पालघरमधील काही अधिकाऱ्यांबद्दलचे निर्णय हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासारख्या प्रभावशाली मंत्र्याला विश्वासात न घेता घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप केल्याचं कळतं. खरंतर यापूर्वीही असं झालं आहे. असे आदेश मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जारी केले जातात. गृहमंत्री त्यासाठी शिफारस करतात. पण त्याआधी त्यांनी संबंधित नेते, मंत्री यांना विश्वासात घेणे राजकीयदृष्ट्या महत्वाचं असतं. तसं घडत नसल्यानं आधी अनिल देशमुखांच्या कारकीर्दीत आणि आता दिलीप वळसे-पाटील यांच्या कारकीर्दीत पुन्हा बढती-बदली-स्थगितीचा खेळ रंगला आहे.
बढती-बदली-स्थगितीचा खेळ!
- महाराष्ट्र पोलीस दलातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांचा आदेश गृहमंत्रालयाने जारी केले.
- अवघ्या १२ तासात त्यातील पाच अधिकाऱ्यांच्या बदलीला गृहमंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.
- मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती.
कोणाची बढती-बदली-स्थगिती?
- राजेंद्र माने राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावरून ठाणे शहरात पूर्व प्रादेशिक विभागात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती.
- महेश पाटील यांना पोलीस उपायुक्त पदावरुन मुंबईतील वाहतूक विभागात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती.
- पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची मुंबईत अप्पर पोलीस आयुक्तपदी (संरक्षण व सुरक्षा) बढती.
- संजय जाधव पुण्यातील महामार्ग सुरक्षा पथकात पोलीस अधीक्षक पदावरून ठाणे शहरात अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) बढती पंजाबराव उगले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून पोलीस मुंबईत अप्पर पोलीस आयुक्तपदी (सशस्त्र पोलीस) बढती.
भाजपाची टीका
- भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सरकारवर या आदेश स्थगितीमुळे भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
- या सरकारचा बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात, त्याआधी गृहमंत्र्यांची सही असते.
- अवघ्या बारा तासात आदेशाला स्थगिती दिली आहे.
- स्थगिती का दिली याबाबत आघाडी सरकारने खुलासा केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.