उदयराज वडामकर / कोल्हापूर
कोल्हापूर विमानतळाच्या विस्ताराला आता वेग येण्याची शक्यता आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक भूसंपादनासाठी राज्य सरकारने २१२ कोटी २५ लाख निधीला मान्यता दिली आहे. हा निर्णय राज्य शासनाच्या शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत घेण्यात आला .
ही मान्यता निश्चितपणे कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, असे मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले कोल्हापूर विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २५.९१ हेक्टर जमिनीचे संपादन करणे गरजेचे होते. त्यासाठी निधीची आवश्यकता होती.
विमानतळ विस्तारीकरणासाठी यापूर्वी ५३ कोटी रुपये निधीस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यापैकी उर्वरित २६ कोटी रुपयांचा निधी २१ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी वितरित करण्यात आला. विस्तारीकरणाच्या पुढील निधीसाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांनी २१२ कोटी २५ लाख निधी चा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला शासनाच्या शक्ती प्रदत्त समितीची मान्यता आवश्यक होती. ती आता मिळाली आहे
या समितीच्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला गेला. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २१२ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीच्या प्रस्तावास मान्यता दिली गेली. यासाठी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विमानतळ चालन संचलनाच्या प्रधान सचिव वर्षा नायर-सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महा विकास आघाडी सरकार हे जनतेचे सरकार असून राज्याच्या विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले. कोल्हापूर विमानतळासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.
पाहा व्हिडीओ: