दिलीप नारायणराव डाळीमकर
जातीय व धर्मद्वेषाचे विष कालवणाऱ्यांच्या मनात आज कालवाकालव सुरू झाली असेल. कारण आपल्या राजकीय चुली पेटत ठेवण्यासाठी काही राजकीय नेते धार्मिक व जातीय भावना भडकविण्याचा प्रयत्न करत आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात अलीकडच्या काळात एक क्रांती झाली.ही क्रांती मराठा क्रांती मोर्च्याच्या रूपाने अवघ्या जगाने बघितली. मराठा मोर्चात सर्व जाती, धर्मांच्या लोकांचा लक्षणीय सहभाग बघितल्यावर आपल्यासाठी दगड कोण उचलणार, घरे कोण जाळणार, तोडफोड कोण करणार, हा प्रश्न धर्मांध राजकीय सामाजिक नेत्याच्या मनात उभा राहत आहे.
याचे कारण अनेक वर्षांनंतर हातात भगवा घेऊन मुसलमान चालताना दिसतोय. मराठा मोर्चात मराठा समाजाच्या पावलाला पाऊल लावून अठरापगड जातीचे लोक सहभागी झालेले होते. हेच या मराठा मोर्चाचे यश असून मराठा मोर्चाने मोर्चाने इतिहासाला एक वेगळी दिशा दिली.
मराठ्यांनी शिवाजी महाराजांच्या काळात एक वेगळा इतिहास लिहिला, अठरापगड जाती एकत्र केल्या, तेच मराठे आता पुन्हा तोच इतिहास लिहीत आहेत. आज परत एकदा अठरापगड जाती एकत्र येत आहेत. मदारी मेहतर नावाची पाणपोई दिसली. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले, तेव्हा त्यांच्यासोबत असलेले आणि आग्रा येथून महाराज निघून रायगडावर सुखरूप पोहोचले, तेव्हा हेच मदारी मेहतर स्वत: महाराजांच्या शय्येवर झोपून राहिले.
आजही त्या मदारी मेहतर यांची आठवण येते. तोच सामाजिक एकोप्याचा इतिहास पुन्हा एकदा मराठे लिहीत असल्याचे दिसून येत आहे. मराठा समाज बदलतोय, मराठे पुन्हा एकदा नवीन इतिहास लिहीत आहेत आणि याच इतिहासावरून संपूर्ण महाराष्ट्र शिकेल आणि पुढे जाईल.
आजकाल भोग्यांचे राजकारण महाराष्ट्रात जोरात शिजत आहे.या राजकारणातून धार्मिक भावना भडकविण्याचा उद्देश दिसून येत आहे. यातून समाजहित घडणार नाही.मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाबरोबर एकत्र आलेल्या अठरापगड जाती व मुस्लिम समाज या धार्मिक द्वेषापासून नक्कीच दूर राहत आहे. त्यामुळे कोणीही कितीही धार्मिक जातीय भावना भडकविण्याचा प्रयत्न केला तरी या छत्रपतीच्या पुरोगामी महाराष्ट्रात दंगली पुन्हा होणार नाही असा विश्वास वाटतो.फुले शाहू आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांनी तरुणांचे डोके सुधारले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात नक्कीच शांतता नांदेल असा मनात विश्वास आहे.
दिलीप नारायणराव डाळीमकर
पुणे