मुक्तपीठ टीम
गुढीपाडव्याच्या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पण त्यानंतर मंगळवारी ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत संजय राऊतांवर टीका केली असली तरी मुख्य लक्ष्य हे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच होते. त्यातही शरद पवारांवर जातीयवादाच्या आरोपांचा पुनरुच्चार करताना त्यांनी एक वेगळाच आरोप केला. शरद पवार आपल्या भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतात. ते योग्यही आहे. पण ते कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं म्हणत नाहीत. कारण, त्यांना मुस्लिम मतं दुरावण्याची भीती वाटते, असा घणाघातही राज ठाकरे यांनी केलाय.
शरद पवारांवर जातीयवादाचा आरोप!
- गुढी पाडवा मेळाव्यानंतर ठाणे उत्तरसभेतही राज ठाकरेंनी शरद पवारांवर जातीयवादाचा आरोप केला.
- जातीयवाद जो आला तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून.
- महाराष्ट्रात जात होतीच, हजारो वर्षापासून जात आहे.
- पण तेव्हा प्रत्येक जातीला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता.
- राष्ट्रवादी काँग्रेसचा १९९९मध्ये जेव्हा जन्म झाला, तेव्हापासून दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण केला गेला.
- मराठी मुलांची माथी भडकावली गेली.
- इतिहास चुकीचा सांगितला गेला म्हणे…राष्ट्रवादीने संभाजी बी ग्रेड, सी ग्रेड अशा संघटना काढल्या आहेत.
- त्या संघटना १९९९नंतरच कशा आल्या? हा योगायोग नाही. त्या यांनीच काढल्या.
पवारसाहेब भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही!
- ‘पुण्यात मुलाखत घेताना मी शरद पवारांना प्रश्न विचारला होता, ती आजही काढून बघा.
- त्याचं वय पाहता मी तेव्हा जास्त खोलात गेलो नाही.
- पण राष्ट्रवादीच्या जन्मापासून शरद पवार ज्या ज्या वेळी भाषण करतात तेव्हा म्हणत की शाहू, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र…हे मान्यच आहे.
- पण त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे.
- पण पवारसाहेब कधीही कुठल्याही सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना दिसणार नाहीत.
- कारण छत्रपतींचं नाव घेतलं आणि मुस्लिम मतं गेली तर काय करायचं? आणि मग छत्रपतींवर राजकारण करायचं असेल, जातीवर राजकारण करायचं असेल, माझ्या तरुणांची, बंधु-भगिनींची माथी भडकवायची असतील तर मग दुसरं कुणीतरी पुस्तकं लिहिलं, ब्राह्मणांनी पुस्तकं लिहिली, मग अजून कुणीतरी काहीतरी लिहिलं.
FakeकीFact? शरद पवार भाषणात खरंच शिवाजी महाराजांचा उल्लेख मुस्लिमांसाठी टाळतात?