मुक्तपीठ टीम
लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेकडून बांधण्यात येत असलेल्या डिलाईल रोड उड्डाणपुलाच्या बांधकामाची आणि तेथे महानगरपालिकेकडून बांधण्यात येत असलेल्या पोहोच रस्त्यांच्या कामांची राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पाहणी केली. तसेच हिंदमाता परिसरातील पावसाचे पाणी साठविण्यासाठी सेंट झेवियर्स मैदानात बांधण्यात येत असलेल्या भूमिगत पर्जन्य जल टाकीच्या कामाची देखील त्यांनी पाहणी केली.
लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील डिलाईल पूल जीर्ण झाल्याने हा पूल रेल्वेने तोडला आहे. त्याचे ८५ मीटर लांबीचे बांधकाम रेल्वे करणार असून यासाठीचा निधी महापालिकेने दिला आहे. तर, एकूण ६०० मीटर लांबीच्या तीन पोहोच रस्त्यांचे बांधकाम महानगरपालिका करीत आहे. या कामांच्या प्रगतीची पाहणी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी आमदार सुनील शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी.वेलरासू, माजी मंत्री सचिन अहिर, माजी महापौर स्नेहल आंबेकर, माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, रेल्वेकडून हाती घेतलेल्या कामास गती देण्याच्या अनुषंगाने मी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. रेल्वे प्रशासनाचे काम पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिकेला पुढील काम हाती घेता येणे शक्य होणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने हाती घेतलेल्या पोहोच रस्त्यांसाठी आतापर्यंत आवश्यक काम गतीने करण्यात आले आहे. रेल्वेने गर्डरचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर महानगरपालिकेचे उर्वरित काम देखील तातडीने पूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले.
आदित्य ठाकरे यांनी हिंदमाता परिसरात साचणारे पावसाचे पाणी साठविण्यासाठी सेंट झेविअर्स मैदानात बांधण्यात येत असलेल्या भूमिगत जल धारण टाक्यांच्या कामाची पाहणी केली. हिंदमाता परिसराच्या भौगोलिक रचनेमुळे अतिवृष्टीप्रसंगी तेथील सखल भागात पाणी साचते. या समस्येवर मात करण्यासाठी महानगरपालिकेने सेंट झेविअर्स मैदानात भूमिगत जल धारण टाकीचे बांधकाम हाती घेतले असून हे काम पूर्णत्वाकडे आहे. या टाक्यांमध्ये दोन कोटी ८७ लाख लीटर पाणी साठवता येणार आहे. त्यामुळे हिंदमाता परिसराला पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येतून मोठा दिलासा मिळेल.
प्रमोद महाजन उद्यानातही अशाच स्वरूपाची भूमिगत जल धारण टाकी बांधली जात आहे. पंपिंग स्टेशन व भूमिगत जलधारण टाकी यामुळे हिंदमाता परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होऊन वाहतूक सुरळीत राहण्यास यापुढे आणखी मदत होणार आहे. मिलन सबवे आणि इतर सखल भागांचाही अभ्यास करून अशाप्रकारची उपाययोजना करण्यात येईल, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.