मुक्तपीठ टीम
प्रलंबित असलेल्या विविध मागण्यासाठी राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. राज्यातील एकूण २२ हजार महसूल कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी महसूल विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.
महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या
- नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करावे.
- महसूल प्रशासनातील रिक्त पदांची तत्काळ भरती करावी.
- पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग-३ पदावर पदोन्नती द्यावी.
- अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातून, दोन वर्षांपासून थांबलेली नायब तहसीलदार पदोन्नती करावी
- प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करावे.
जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिटीसर्वे कार्यालय, पुनर्वसन कार्यालय ,अन्नधान्य वितरण कार्यालय ,संजय गांधी निराधार शाखा आधी कार्यालयातील कामकाज आज ठप्प आहे. त्यामुळे आठवड्याचा पहिला दिवस असल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे .
कोल्हापुरात निवडणूक कर्मचारी सोडून सर्व संपावर!
कोल्हापूर उत्तर च्या निवडणूक कामकाजासाठी नियुक्त कर्मचारी वगळता सर्व जण संपात सहभागी होऊन झाले आहेत. नायब तहसीलदार सेवांतर्गत पदोन्नती द्या, महसूल सहाय्यकांची रिक्त पदे तात्काळ भरा या दोन मागण्यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचारी बेमुदत संप करत आहेत. दरम्यान मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.