मुक्तपीठ टीम
वकील सतीश उके यांच्या घरावर गुरुवारी सकाळी अंमलबजावणी संचलनालयाने धाड टाकली. यावरुन आता नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. वकील सतीश उकेंकडे न्या. लोया मृत्यूप्रकरण, निमगडे प्रकरण आणि इतर महत्वाच्या प्रकरणांच्या फाईल्स होत्या. या फाईल्स ताब्यात घेण्यासाठीच ‘ईडी’कडून सतीश उकेंच्या घरावर छापा टाकण्यात आला असून हा छापा मुंबईतील ईडीच्या अधिकाऱ्यांकडून टाकण्यात आला. नागपूरमधील ईडीचे कार्यालय या सगळ्याचा पत्ताही नव्हता, असा दावा नाना पटोले यांनी केला.
सतीश उके यांच्या घरी मुंबईतील ईडी अधिकारी!
- उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी या प्रकरणात स्यू मोटो याचिका दाखल करून हस्तक्षेप करावा.
- ईडीचा कायदा हा ड्रग माफिया आणि दहशतवादाला चाप लावण्यासाठी तयार करण्यात आला होता.
- मात्र, आता त्या कायद्याचा गैरवापर केला जात आहे.
- एका वकिलाच्या फाईल्स जप्त करण्यासाठी ईडीचा वापर होत आहे.
- सतीश उके यांच्या घरी मुंबईतील ईडी अधिकारी फौजफाटा घेऊन पोहोचले होते.
- नागपूरमधील ईडी कार्यालयाला याची माहितीही नव्हती.
- या सगळ्या दबावतंत्राचा वापर कशासाठी केला जात आहे?
भाजपाच्या हिटलशाहीपासून देशातील लोकशाही वाचली पाहिजे!
- न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरण आणि निमगडे प्रकरणात सतीश उके यांची भूमिका महत्त्वाची आहे.
- त्यामुळेच सतीश उके यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याकडील फाईल्स जप्त करण्यात आल्या.
- ईडीच्या कायद्यात कोणावर कारवाई करावी, हे नमूद करण्यात आले आहे.
- मात्र, हे नियम डावलून ईडीचा गैरवापर सुरु आहे.
- त्यामुळे आता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि देशाच्या सरन्यायाधीशांनी यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे.
- भाजपाच्या हिटलशाहीपासून देशातील लोकशाही वाचली पाहिजे.