मुक्तपीठ टीम
डोळ्यांना सुखावणारी रंगसंगती. काचेच्या भिंती. परिसर अगदी स्वच्छ. शाळेच्या एका वर्गात काँप्युटर्सची मांडणी. बाहेर हिरवळं. मनावर अत्याधुनिकतेचा ठसा उमटवणारं सारं काही. एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणसंस्थेसारखंच सारं. मात्र, हे सारं पाहायला मिळतं पारनेर तालुक्यातील पानोली गावातील जिल्हा परिषद शाळेत.
लोकसहभागातुन उभी राहिलेली आमच्या तालुक्यातील पानोली येथील डिजिटल जिल्हा परिषद शाळा👌 pic.twitter.com/6KQHQUIP7Q
— Aniket_Bhogade (@AniketBhogade) March 23, 2022
गावाचे सरपंच शिवाजी शिंदे अवघ्या ३१ वर्षांचे. त्यांनी गावचा कारभार हाती घेतला तोच गावकऱ्यांच्या सहभागानं गावाचा कारभार सुरु केला. बदलत्या काळानुसार गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. त्यांना गावातील प्रत्येकाचं सहकार्य लाभलं. लोकसहभागातून त्यांनी डिजिटल शाळेच्या संकल्पनेवर काम सुरु केले. कमिन्स इंडियाच्या सीएसआर निधीतून त्यांना सहकार्य लाभलं.
आता पानोलीच्या शाळेतील एक डिजिटल वर्ग सज्ज झाला आहे. आमदार निलेश लंकेच्या मार्गदर्शनाखाली, लोकसहभाग आणि कमिन्स इंडियाची निधी मदत यातून हे कार्य झाल्याचं ते सांगतात. तसंच या वर्गाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
पारनेरमधील पानोली गावचं वेगळंपणा
- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पानोली गाव तसां वेगळ्या उपक्रमांसाठी ओळखला जातं.
- ऐक्य सेवा सेंटर, कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व नाबार्ड यांच्या दत्तक योजनेत पानोली गावाचा समावेश झाला होता.
- या संस्थांच्या वतीने गावात अनेक विकास कामे करण्यात आली आहेत.
- गावात दरवर्षी नियमित झाडांची लागवड करण्यात येत आहे.
- त्यामुळे पानोली गाव लोकसहभाग व श्रमदानातून आदर्श गाव घडत आहे.