मुक्तपीठ टीम
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच बीपीसीएलने त्यांच्या भारत गॅस ग्राहकांसाठी व्हॉइसआधारित डिजिटल पेमेंट सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नाही त्यांच्यासाठी सोयीस्कर ठरेल. बीपीसीएलने म्हटले आहे की, त्यांनी व्हॉइस आधारित डिजिटल पेमेंट्स सुलभ करण्यासाठी अल्ट्राकॅश टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडशी भागीदारी केली आहे. या सुविधेमुळे स्मार्टफोन किंवा इंटरनेट सुविधा नसलेल्या भारत गॅस ग्राहकांना UPI123PAY द्वारे एलपीजी सिलिंडर बुक करण्यास आणि पैसे भरण्यास मदत होईल.
भारतातील ४ कोटी ग्राहकांना सुविधेचा होणार फायदा
- ही सुविधा सुरू केल्याने, ग्रामीण भागातील भारतगॅसच्या सुमारे ४ कोटी एलपीजी ग्राहकांना फायदा होईल.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गेल्या आठवड्यात UPI123PAY लाँच करण्याची घोषणा केल्यानंतर बीपीसीएल आपल्या ग्राहकांना ही सेवा देणारी देशातील पहिली कंपनी आहे.
अल्ट्राकॅश हे अल्ट्राकॅश टेक्नोलॉजीद्वारे विकसित केलेले आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे अधिकृत केलेले मोबाइल पेमेंट अॅप्लिकेशन आहे. या टाय-अपद्वारे, भारतगॅसचे ग्राहक इंटरनेटशिवाय फोनवरून ०८०-४५१६-३५५४ या क्रमांकावर कॉल करून स्वत:साठी किंवा इतरांसाठी भारतगॅस सिलेंडर बुक करू शकतील. तसेच त्याद्वारे पेमेंटही करता येते.