मुक्तपीठ टीम
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या थोरल्या मुलाचा म्हणजेच पार्थ पवारांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पार्थ यांना आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांमध्ये चर्चा रंगली आहे ती राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांच्या फेसबूक पोस्टची. त्यांनी शुभेच्छा देताना थेट शिवसेनेला साद घालत पार्थ पवारांसाठी ते पहिल्याच पदार्पणात अयशस्वी ठरलेल्या मावळ मतदारसंघाचा त्याग करण्याची मागणी केली आहे.
सध्या राज्यात राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने मावळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीला द्यावा अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली आहे. यासाठी त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.
पार्थ पवारांच्या वाढदिवसानिमित्त ही मागणी शिवसेनेकडे केली आहे. पार्थ पवार यांच्यासाठी शिवसेनेने मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
”महाविकास आघाडीने ठरविल्याप्रमाणे पुढील निवडणूक आघाडी लढणार आहे. त्यामुळे मावळची जागा ही पार्थ अजित पवार यांना देऊन बारणे यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवावे. २००५ मध्ये जेव्हा सुप्रीया सुळे या राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी सुप्रियाताईंना बिनशर्त पाठिंबा दिला होता. आज तोच दिलदारपणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी दाखवावा,” असे माझ्या सारख्या एका सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाटते,” असे ते त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे बोलले आहेत.
नितीन देशमुखांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये मांडलेले मुद्दे
भाजपाच्या आयटी सेलने पार्थ पवारांचा घात केल्याचा आरोप!
१. २०१९ साली त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरु केली.
२. पार्थदादा यांना नामोहरण करण्यासाठी जणू भाजपचा आयटी सेल फडणवीस पेक्षाही पार्थदादांवर जास्त नजर ठेवून होता.
३. महाराष्ट्रात आजवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला इतक्या खालच्या पातळीचा प्रचार झाला नव्हता. तो पार्थदादांच्या पराभवासाठी करण्यात आला.
४. पार्थ पवार मावळच्या निवडणुकीनंतर थांबले नाहीत. पार्थ पवार फाऊंडेशन या संस्थेच्या मार्फत मावळमधील आदिवासी भागात चांगलं काम सुरु आहे.
५. सर्वांचे प्रश्न समजून घेत पार्थ अजित पवार २०१९ पासून प्रसिद्धीच्या झोतात न येता, आपलं काम करत आहेत. पुढील निवडणुकीत याचा प्रत्यय महाराष्ट्राला आल्याखेरीज राहणार नाही.
पराभवानंतरही पार्थ पवारांचं मावळमध्ये काम सुरुच असल्याचा दावा!
६. मला पार्थ अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे करायची आहे. पार्थदादांना एक फेअर चान्स मिळाला पाहिजे.
७. मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे संसदरत्न खासदार आहेत. त्यांच्या कामाची चुणूक आपण सर्वांनीच पाहिली आहे.
८. आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणेच पार्थ अजित पवार उच्चशिक्षित आहेत. त्यांचे संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य मी स्वतः पाहिले आहे.
९. पार्थ पवार यांच्या सारखा तरुणही महाराष्ट्रातील युवकांचा बुलंद आवाज बनू शकतो, अशी माझी खात्री आहे.
१०. राज्यातील युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पार्थ यांना पुढील लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून संधी द्यावी. तसेच श्रीरंग बारणे साहेबांना सन्मानाने सर्वमताने राज्यसभेची खासदारकी द्यावी. आम्हा तरुण कार्यकर्त्यांची हिच इच्छा आहे .