तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम
जर सध्याच्या घटनाक्रमात उद्धव ठाकरे फक्त शिवसेना पक्षप्रमुख असते, आघाडीचे मुख्यमंत्री नसते तर दैनिक सामनामध्ये शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि सामनाचे संपादक उद्धव ठाकरे यांची एक खास मुलाखत प्रकाशित झाली असती.
त्यात पुढील प्रश्नोत्तरं नक्कीच असती:
संजय राऊत – मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन विकत घेतली आणि दाऊदच्या बहिणीला पैसे दिल्यामुळे आघाडीचा एक मंत्री…
उद्धव ठाकरे – …नावही घेऊ नका त्या गद्दाराचं. ही मुंबई आज शिवसेना आहे म्हणून आहे. विसरू नका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईकर दंगलीत वाचले. पुढे बॉम्बस्फोटांनी हादरलेल्या मुंबईलाही आधार दिला तो फक्त आणि फक्त शिवसेनेनेच. त्यावेळी जे मुख्यमंत्री होते त्याच शरद पवारांचा पक्ष आज सत्तेत आहे. आणि त्यांचा एक मंत्री असे धंदे करतो आहे. तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. ही मुंबईच्या मुळावर आलेली अवलाद आहे. बाळासाहेब सांगायचे ते उगाच नाही. मुंबईचं भंगार करण्याचा या भंगारवाल्यांचा कट शिवसेना उधळून लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. माझे शिवसैनिक या भंगारवाल्यांनाच भंगारात टाकतील. शेवटी कितीही झालं तरी आम्ही हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगतो तो काही उगाच नाही.
संजय राऊत – धक्कादायक वाटते…ते तुरुंगात तरीही मंत्रीपदीच आहेत…
उद्धव ठाकरे – लाज वाटत नाही. मंत्री तुरुंगात. तरीही मंत्रीपदी. आठवा आमच्या शिवशाहीत काय झालेलं? शशिकांत सुतार, बबनराव घोलप. बाळासाहेबांनी राहू दिलं नाही सत्तेत. खरं तर फक्त आरोप होते. तरीही. ही अशी असते शिवशाही. आम्ही आज जर मुख्यमंत्री असतो तर एक क्षणभर अशा गद्दाराला मंत्रीपदी ठेवले नसते. खरंतर अशांची नाही तर त्यांच्या गॉडफादरचीही चौकशी लावली असती.
संजय राऊत – ते एक स्टिंग सध्या गाजतेय…
उद्धव ठाकरे – स्टिंग फोडते बिंग ना! वाईट काय? ते कुणी केले का केले त्याला महत्व नाही. त्याने फोडलेले बिंग पाहा. ज्यांनी शिवसेनेचा घात करत युती फोडल्याची घोषणा केली त्या खडसेंच्या सर्व पापाचं बिंग फुटतं आहे. चांगलंच आहे.
संजय राऊत – पण खडसे सत्ताधारी पक्षातील आणि चौकशीही राज्यातील पोलीसच करणार…
उद्धव ठाकरे – हे म्हणजे कसं माहित आहे, लफडेबाजांनी दुसऱ्या चवचाल मित्राला चारित्र्याचा दाखला देण्यासारखं आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण त्यांची यांनी गुलामासारखी अवस्था केली आहे. कसे ते यांची चौकशी करणार? ते काही नाही. असं चालणार नाही. त्या खडसेंचं पाप उघडकीस आलंच पाहिजे. जर काही चूक नव्हती तर त्या सरकारी वकिलाने राजीनामा का दिला? जर आरोप झाले म्हणून दिली तर मग त्या भंगारवाल्यावर गंभीर गुन्हा नोंदवला आहे. तो तुरुंगात आहे. त्याचा का राजीनामा नाही. हा दुटप्पीपणा झाला. हा खपवून घेतला जाणार नाही!
(भांग न घेता संपूर्ण शुद्धीत धुळवडीनिमित्त दिवसाढवळ्या केलेला कल्पनाविलास…हे १०० टक्के काल्पनिक आहे. कुणाला वाईट वाटलं तर वाटू द्या, हा कल्पनाविलासाचा रंग आज एन्जॉय करा.)
मुक्तपीठ – होळीनिमित्त फूल टू फेक बातमीपत्र – धुळवडीनिमित्त कल्पनाविलास:
- उद्धव ठाकरे फक्त शिवसेना पक्षप्रमुख असते तर… वाचा उद्धव ठाकरेंनी न दिलेली आणि संजय राऊतांनी न घेतलेली रोखठोक मुलाखत…
- देवेंद्र फडणवीस भाजपा-राकाँपा युतीचे मुख्यमंत्री असते तर…मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी विधानसभेत न केलेले स्टिंगचं बिंग फोडणारं भाषण…
- अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते असते तर…अर्थसंकल्पातील अनर्थ मांडत शिक्षणसेवक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, एसटीच्या उपेक्षेवर काय बोलले असते?
- प्रवीण दरेकर हे भाजपाचे नेते नसते, तर किरीट सोमय्या काय बोलले असते? “दरेकरांशी राऊत, पवारांचं संगनमत, पोलीस काय करणार? आता सीबाआय, ईडी मागे लावतो!” बोलले असते?
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
संपर्क – 9833794961
ट्विटर @TulsidasBhoite @Muktpeeth