मुक्तपीठ टीम
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह याला पंजाबमधून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्यासाठी तयारी सुरु असल्याची माहिती आहे.हरभजन सिंहला राज्यसभेवर पाठवण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांचे प्रयत्न सुरु असल्याची बातमी आहे. त्यामुळे आता भारताचा माजी क्रिकेटपटू आणि फिरकी गोलंदाज हरभजन सिंह आता क्रिकेटच्या मैदानातून राजकीय क्षेत्रात उतरणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पंजाबमध्ये नव्याने स्थापन झालेले आम आदमी पक्षाचे सरकार क्रीडा विद्यापीठाची कमान हरभजनकडे सोपवू शकते. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकतेच जालंधरमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या मोठ्या विजयानंतर हरभजनने ट्विट करून भगवंत मान यांचे अभिनंदन केले होते. त्यांनी लिहिले, “आम आदमी पार्टी आणि मित्र भगवंत मान आमचे नवीन मुख्यमंत्री बनल्याबद्दल अभिनंदन. भगतसिंग यांच्या खटकरकलन गावात नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत हे जाणून आनंद झाला. हा आईसाठी अभिमानाचा क्षण आहे. .”
पंजाबमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्षाने मोठा विजय नोंदवला आहे. भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ११७ पैकी ९२ जागा जिंकल्या.