मुक्तपीठ टीम
होळीचा सण जवळ आला आहे त्यात कोरोना निर्बंधही कमी झाले आहेत. निर्बंध कमी झाल्याने सर्वत्र होळी आणि रंगपंचमीची लगबग सुरु आहे. तुम्हचीही अशीच लगबग सुरु असेल तर लक्षपूर्वक ही बातमी वाचा. कारण होळी आणि रंगपंचमीसाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. राज्याच्या गृह खात्याकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली असून हे नियम पाळावेच लागणार आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
या नियमावलीनुसार रात्री १० नंतर होळी पेटवू शकत नाही. तसेच होळीदरम्यान डीजे लावण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे. दहावी – बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने डीजे न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक नियमांचेही पालन करावे, असे आवाहन केले आहे.
राज्य सरकारची नवी नियमावली कोणती?
- रात्री दहाच्या आत होळी करावी. दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक.
- होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी आहे.
- दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल.
- होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल.
- होळी खेळताना महिला तसेच मुलींची खबरदारी घेण्याचे आवाहन.
- कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.
- धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.