मुक्तपीठ टीम
भारतीय रेल्वेचा प्रवास आरामदायी असण्यासोबतच आता अधिक सोयीस्कर होत आहे. आता तुम्ही रेल्वेच्या प्रवासादरम्यान तुमची अनेक महत्त्वाची कामे करू शकणार आहात. रेल्वेमध्ये प्रवास करताना मोबाईल रिचार्ज, वीज बिल भरणे तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड सहज मिळू शकते.
रेल्वे संघटना रेलटेल विविध स्थानकांवर रेल वायर साथी कियोस्कच्या माध्यमातून अनेक सुविधा सुरू करत आहे. रेल्वे प्रवासी कियॉस्कच्या माध्यमातून प्रवासादरम्यान बरीच कामे करू शकतील. प्रवाशांना रेल्वे तिकीटापासून ते विमानाच्या तिकिटांपर्यंत रिझर्वेशन करता येणार आहे. याशिवाय तुम्ही स्टेशनवरूनच आधार आणि पॅनसाठी अर्ज करू शकता. रेल्वेच्या या सुविधेमुळे प्रवाशांच्या सुविधांमध्ये आणखी वाढ होणार आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, रेलटेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये प्रवाशांना तिकीट बुकिंग, मतदार कार्ड बनवणे, मोबाईल रिचार्ज, वीज बिल, पॅन कार्ड, बँकिंग विमा आणि आधार कार्ड यांसारख्या अनेक सुविधा प्रदान केले जात आहे. या सुविधेला ‘रेल वायर साथी कियोस्क’ असे नाव देण्यात आले आहे.
सुरुवातीला, भारतीय रेल्वे देशातील दोनशे स्थानकांवर ही सुविधा देण्याची तयारी करत आहे. रेलटेलची ही सेवा वाराणसी आणि प्रयागराज येथूनही सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, भारतीय रेल्वे आपल्या सेवांचा सातत्याने विस्तार करत आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी, आधार पॅन अर्जासोबतच, रेल्वे वीज बिल आयकर रिटर्न भरण्याची सुविधा देत आहे.