मुक्तपीठ टीम
एकेकाळी देशातील पहिल्या दलित मुख्यमंत्री असलेल्या बसपाच्या सुप्रीमो मायावतींचा यदांच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. पक्षाला यावेळी ४०२पैकी फक्त एका जागेसाठी समाधान मानावे लागले आहे. एक कोटी १८ लाख मते मिळविणाऱ्या बसपाला उत्तर प्रदेशात एकच जागा मिळाली, तर उत्तरप्रदेशमध्ये दलित मतदारांची संख्या केवळ तीन कोटी आहे. मोठ्या संख्येने दलित व्होट बँक बदलल्यामुळे बसपाच्या रणनीतीकारांची झोप उडाली आहे. यामुळे भविष्यातील योजनांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मायावतींना यावेळी १२.९ टक्के मते…
- या निवडणुकीत बसपाला १२.९ टक्के मते मिळाली.
- त्यांना एकूण एक कोटी १८ लाख ७३ हजार १३७ मते मिळाली.
- उत्तरप्रदेशमध्ये दलित मतदारांची संख्या सुमारे तीन कोटी आहे.
- असे नाही की सर्व दलित नेहमीच बसपासोबत राहिले आहेत, पण त्यातील एक मोठा वर्ग नेहमीच बसपासोबत राहिला आहे.
- यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतांची फेरफार झाल्याचे समोर येत आहे.
- या वेळीही बसपाचे संवर्गातील मतदार अर्थात जाटव वर्ग बराचसा बसपासोबत राहिला हेही खरे असले तरी इतर दलित मात्र विखुरले गेले.
यावेळी बसपाला एकाच जागेवर समाधान…
- २०१७ च्या निवडणुकीत बसपाला २२.२३ टक्के म्हणजे एक कोटी ९२ लाख ८१ हजार ३४० मते मिळाली होती.
- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही बसपाला १९.६० टक्के मते मिळाली होती. मात्र, त्या निवडणुकीत बसपाला एकही जागा मिळवता आली नाही.
- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाच्या मतांच्या टक्केवारीत कोणतीही वाढ झाली नाही, परंतु सपासोबतच्या युतीचा फायदा झाला. बसपाने १० जागा जिंकल्या.
- २०१७ च्या निवडणुकीत बसपाच्या मतांची टक्केवारी २२.२४ टक्क्यांपर्यंत वाढली पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना फक्त १९ जागा मिळाल्या. यावेळी टक्केवारी सुमारे दहा टक्क्यांनी कमी होऊन एक जागा मिळाली.
दलित मतदार हातातून जाण्याची मायावतींना चिंता…
- आता दलित मतदार कायमस्वरूपी इतर पक्षांकडे वळू नयेत याची बसपच्या सुप्रीमो मायावतींना चिंता आहे.
- मायावतींनीही पराभवानंतर मांडलेल्या स्पष्टीकरणात ही चिंता व्यक्त केली आहे.
- त्यांनी भाजपा आणि सपावर निशाणा साधला असतानाच त्यांनी खास काँग्रेसवरही टीका केली आहे.
- काँग्रेस हा अत्यंत जातीयवादी पक्ष आहे.
- बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांना नेहमी त्यांच्या मार्गातील अडसर समजून त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत यशस्वी होऊ दिले नाही.
- त्यांनी आपल्या समाजातील लोकांना काँग्रेससारख्या जातीयवादी पक्षांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.